breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

वाघिणीच्या नवजात शावकाला तिचाच दात लागल्याने मृत्यू, याआधीही ४ नवजात पिलांना केले स्वत:च ठार

  • गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील घटना

नागपूरः बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ली वाघिणीच्या नवजात शावकाला तिचाच दात लागल्याने मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. महाराजबागेतून गोरेवाडा येथे आणलेल्या ली वाघिणीने दुपारी चार वाजण्य़ाच्या सुमारास एका पिल्लाला जन्म दिला. त्यानंतर या पिल्लाला उचलताना वाघिणीचा दात लागून पिल्लाचा मृत्यू झाल्याचे प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या लक्षात आले. यावेळी प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकांसह महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक प्राणिसंग्रहालयात उपस्थित होते. रात्री उशिरा या वाघिणीच्या प्रसवपीडा थांबल्यानंतर तिच्या गर्भात आणखी पिल्ले आहेत किंवा नाहीत, असल्यास त्याबाबत पुढील उपचार काय करावेत, याबाबत या तज्ज्ञ डॉक्टर काम लक्ष ठेवून आहेत.

ली आणि राजकुमार या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या जोडीला पिल्ले होण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. ली वाघिणीचे वय जास्त असल्याने या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी येत होत्या. वाघांचे वय सामान्यत: १० ते १२ वर्षे असते आणि ली वाघीण सध्या ११ वर्षांची आहे. गेले महिनाभर ली वाघिणीला राजकुमारपासून स्वतंत्र ठेवून तिच्या गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

नैसर्गिक पद्धतीने पिले व्हावीत, याकरिता तिच्या रात्र निवाऱ्यात विशेष बाळंतगुफा तयार करण्यात आली आहे. या गुफेत तापमान आणि प्रकाश नियंत्रण व्यवस्थेव्यतिरिक्त रबरी मॅट, गवताच्या गाद्या याशिवाय़ कूलरची सोय देण्यात आली होती. वाघिणीच्या नैसर्गिक वर्तणुकीत बदल न होता लक्ष देण्यासाठी विशेष सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मंग‌ळवारी दुपारी या वाघिणीने एका पिलाला जन्म दिला. त्याला उचलताना दात लागल्याने या शावकाच मृत्यू झाल्याचे गोरेवाडा प्राणिसंग्रहालय प्रशासनाने म्हटले आहे. यावेळी प्राणिसंग्रहालय संचालक एस. एस. भागवत, गोरेवाडा वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक डॉ. व्ही. एम. धूत, पशुवैद्यकीय विद्यापीठाचे प्राणिप्रसव विभागाचे तज्ज्ञ डॉ. एम. एस. पाटील, प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक डॉ. मयूर पावशे आणि डॉ. सुजित कोलंगठ, जनरल क्युरेटर दीपक सावंत, बाय़ोलॉजिस्ट शुभम छापेकर यांच्यासह प्राणीसंग्रहालयाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चार नवजात पिलांना केले स्वत:च ठार

यापूर्वी ली वाघीण २०१६ साली साहेबराव नावाच्या वाघापासून एकदा गर्भार राहिली होती. त्यावेळी तिने चार पिल्लांना जन्म दिला होता. मात्र, त्यावेळेस तिला मातृत्व भावना नसल्याने काही वेळातच तिने सर्व पिल्लांना मारले होते. आईपासून लहाणपणीच विभक्त झालेल्या बहुतेक मांसाहारी प्राण्यांमध्ये अशी लक्षणे पहिल्या बाळंतपणात दिसून येतात, अशी माहिती विशेषज्ञांनी दिली. दरम्यान, यावेळेसही तिने पिल्लांना न स्वीकारल्यास त्यांच्या संगोपनासाठी विशेष इन्क्युबेटरची व्यवस्था प्राणिसंग्रहालयामध्ये करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button