breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणेमहाराष्ट्रमुंबई

विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन; ‘हिंदूस्थानी भाऊ’ची चिथावणी; मुंबई, पुणे, नागपुरात पडसाद

मुंबई, पुणे, नागपूर |

समाजमाध्यमांवर ‘हिंदूस्थानी भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीच्या चिथावणीमुळे सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शने केली. मुंबईतील धारावी भागात हा तथाकथित ‘हिंदूस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदूस्थानी भाऊ’ (खरे नाव विकास पाठक) धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.

नागपूरमध्येही ‘हिंदूस्थानी भाऊ’च्या आवाहनावरून क्रीडा चौक भागात हजारो विद्यार्थी दुपारी १२च्या सुमारास गोळा झाले. त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा, शिक्षण ऑनलाइन असताना परीक्षा ऑफलाइन कशा, असा सवाल करीत, ‘हिंदूस्थानी भाऊ’चा जयजयकार करण्यात आला. मेडिकल चौक येथे मोर्चा येताच काही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडल्या. पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हिंसक होऊ लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु एका गटाने पंडित बच्छराज शाळेसमोरील स्कूल बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे आंदोलन पुन्हा पेटले. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पाच विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलक विद्यार्थी असल्याने पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर ठरावीक वर्गातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेतील मजकूर प्रसारित करणारा ‘हिंदूुस्थानी भाऊ’ विकास पाठक यानेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला. तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना समाजमाध्यमावर दिली होती. मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने समाजमाध्यमावर जाहीर केले होते. या ‘हिंदूुस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली. त्याच्या या संदेशांनी विद्यार्थ्यांना चिथावणी मिळाली. ‘हिंदूस्थानी भाऊ’च्या चिथावणीमुळे सोमवारी धारावीत हजारो विद्यार्थी जमले. दुपारी १२ ते १ दरम्यान धारावीत विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली. विद्यार्थ्यांनी घोषणा फलकांद्वारे सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. काही वेळातच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू केली आणि दगड, चपला, अंडी फेकली. त्यात काही पोलीसही जखमी झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • धारावीत हुल्लडबाजांची गर्दी

धारावीत जमलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हुल्लडबाज अधिक होते. बहुतांशी विद्यार्थी मुखपट्टीविना होते. सरकारविरोधात विद्यार्थी अर्वाच्च घोषणा देत होते. ‘काही विद्यार्थी हिंसक झाल्याने त्यांच्या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले. विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. परंतु विद्यार्थी आक्रमक झाले होते. अखेर पोलिसांना हुल्लडबाजांवर सौम्य लाठीमार करावा लागला,’ अशी माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्याने दिली.

  • धारावीचीच निवड का?

शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड धारावीतील ‘गोल्ड फील्ड टॉवर’ येथे राहात असल्याची चुकीची माहिती मिळाल्याने ‘हिंदूस्तानी भाऊ’ त्यांना भेटण्यासाठी धारावीत आला होता. परंतु तेथे वर्षां गायकवाड यांचे निवासस्थान नाही. परंतु या माथेफिरूने विद्यार्थ्यांना भडकवल्याने काही काळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

  • कोण हा हिंदूस्तानी भाऊ?

विकास पाठक हा ‘हिंदूस्तानी भाऊ’ या नावाने समाजमाध्यमांवर वावरतो. तो मुंबईत राहातो. देशभक्तीच्या नावाखाली तारतम्य सोडून, अर्वाच्च भाषेतील मजकूर तो प्रसारित करतो. तो काही सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी आहे. ‘बिग बॉस’च्या सीझन १३ मध्येही तो सहभागी झाला होता. त्याचे यूटय़ूब चॅनेल असून त्याच्या अनुसारकांची संख्या ५.४० लाख आहे. त्यातून तो वर्षांला लाखो रुपये कमावतो. टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ‘हिंदूस्थानी भाऊ’ या नावाने तो प्रसिद्ध आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे वयाच्या सातव्या वर्षी त्याला हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करावी लागली होती. तो घरोघरी जाऊन अगरबत्तीची विक्रीही करीत होता, असे सांगण्यात येते.

  • ‘हिंदूस्तानी भाऊ’च्या कुरापती

हा हिंदूस्थानी भाऊ तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. तो समाजमाध्यमांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनुसारक आहे. मोदी यांच्या अनेक ध्वनिचित्रफितीही तो अग्रेषित करतो. आपल्या यूटय़ूब चॅनेलवर तो आक्षेपार्ह भाषेतील चित्रफिती प्रसारित करतो. नकलाही करतो. त्याने मोटारीत बसून एक चित्रफीत बनवली होती. ती मोठय़ा प्रमाणावर प्रसारित झाली होती. त्याचे ‘रुको जरा सबर करो’ हे वाक्यही प्रचंड गाजले होते. तो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कायम प्रकाशझोतात राहतो. भारताची कथित बदनामी करणाऱ्या परदेशी टिकटॉकर्सला त्याने अर्वाच्च भाषेत उत्तरे देण्यास सुरुवात केल्यामुळे तो प्रसिद्ध झाला. यूटय़ूब चॅनेलवर तो पाकिस्तानच्या विरोध आक्षेपार्ह भाषेतील व्हिडीओ प्रसारित करतो.

  • ‘चौकशीअंती कठोर कारवाई’

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले. दहावी-बारावीच्या परीक्षांबाबतच्या सूचनांवर राज्य सरकारची चर्चेची तयारी आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या भावना भडकावून त्यांना कोणी रस्त्यावर उतरवू नये.

वर्षां गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button