breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्यसभेचं विजयी सेलिब्रेशन, देवेंद्र फडणवीसांचा ललकार, आता माघार नाही तर स्वबळावर २०२४ जिंकायचं!

मुंबई : “आताची छोटी लढाई होती. मोठी लढाई बाकी आहे. पण येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती सगळीकडे आपण या सरकारला परास्त करणार आहोत. २०२४ ची लोकसभा आणि विधान सभा एकहाती भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि राज्यात बहुमताचं सरकार आणेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. ऐन निवडणूक काळात फडणवीसांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनी शांततेच्या काळात अधिकचा घाम गाळला, त्याचं फळ भाजपला तिसऱ्या जागेच्या विजयी रुपात मिळालं. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास भाजप प्रदेश कार्यालयात विजयी सेलिब्रेशन झालं. त्यावेळी फडणवीसांनी विजयी उमेदवारांचा तथा नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार केला तसेच भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

फडणवीस म्हणाले, “मी कालदेखील बोललो, आपला विजय लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला आहे. कारण शारिरिक स्थिती ठीक नसताना ते मुंबईत आले, काहीही झालं तरी मतदान करणारच, असा त्यांनी निश्चय केला. त्यांच्यामुळेच आपली तिसरी जागा निर्विवाद जिंकून आली. दोघांचेही आभार मानतो”.

काही लोक बावचळले तर काही लोक पिसाटले आहेत

“आपण जिंकल्यानंतर आता अनेक लोकांच्या तोंडाचं पाणी पळालंय. काही लोक बावचळले आहेत तर काही पिसाटले आहेत. पण आपण जिंकलो आहोत. जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. जिंकल्याचा आनंद व्यक्त करायचा असतो. विजयाचा उन्माद करायचा नसतो. आम्ही सगळे आनंदात आहोत. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करुयात”

२०२४ ची लोकसभा आणि विधानसभा भाजप एकहाती जिंकेल

“आताची छोटी लढाई होती. मोठी लढाई बाकी आहे. पण येणाऱ्या काळातील महानगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती सगळीकडे आपण या सरकारला परास्त करणार आहोत. मला विश्वास आहे, २०२४ ची लोकसभा आणि विधान सभा एकहाती भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि राज्यात बहुमताचं सरकार आणेल”.

आपल्याला मदत करणाऱ्या आमदारांचं हे काहीही वाकडं करु शकणार नाही!

“हे सांगतायत की भाजप कुणामुळे जिंकले, हे आम्हाला माहितीय. पण तुम्हाला जरी माहिती असेल तरी तुम्ही काहीच वाकडं करु शकणार नाही. त्याचं कारण म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्यावर जर सरकारने कारवाई करायची ठरवली तर सरकार धोक्यात येईल. मग त्याचवेळी जे आपल्याला मदत करु इच्छित होते, पण दबावामुळे मदत करता आली नाही, ते ही सरकारची साथ सोडतील”, असा दावा करत फडणवीसांनी राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

राज्यसभा झाँकी हैं, विधान परिषद बाकी हैं…!

“चंद्रकांतदादांनी सांगितलेलं खरंय, विधान परिषद निवडणुकीच्या ६ जागा आपण लढवतो आहोत. कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण सरकारमधील अंर्तविरोध पाहता आणि सिक्रेट बॅलेट वोट सिस्टीम पाहता आपल्याला चांगलं मतदान होईल. सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन अनेक आमदार आपल्याला मतदान करतील”

मुख्यमंत्र्यांनी बारीक विचार करावा!

मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन बारीक विचार करायला पाहिजे. महाराष्ट्र थांबलाय, विकास थांबलाय. केवळ आमच्याशी लढायचं म्हणून आमच्या काळात सुरु झालेले सगळे प्रकल्प थांबवून महाविकास आघाडी जनतेचं अतोनात नुकसान करत आहे.

नाहीतर मलाही यांनी नोटीस दिली असती!

राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाडं. मी नशिबवान आहे. माझं मुंबईत घरच नाहीये. नाहीतर मलाही नोटीस आली असती. मला नोटीस द्यायची म्हटलं तर सरकारी बंगल्याला नोटीस द्यावी लागेल, असा टोला फडणवीसांनी लगावला.

आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही बनविलेलं सरकार चालवून दाखवा!

“केवळ सरकार चालविण्याकरिता बदल्याची भूमिका ठेवणे योग्य नाही. २०१९ साली मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने सेना-भाजपला क्लिअर मॅन्डेट दिलं होतं. पण या सत्तेचा अपमान झालं. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही बनविलेलं सरकार चालवून दाखवा. एकतरी चांगलं काम करुन दाखवा. अडीच वर्षाचा काळ गेला, पण दाखविण्यासाठी एक काम नाही. मोदी सरकारची कामे या सरकारला दाखवावी लागतात. जीएसटीचा पैसा दिल्यानंतरही यांची सारखी तीच ओरड असते. पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी करायला तयार नाही. पण या सरकारला इंधनाचे भाव कमी करायला लागतील..”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button