TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्यान, सार्वजनिक शौचालय, स्वच्छता बांधकामासाठी प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर करा; आयुक्तांचे आदेश

पिंपरी चिंचवड | शहरी भागात तयार होणा-या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याचा पुनर्वापर उद्यान विषयक कामे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, महापालिकेची विविध बांधकामे अशा विविध ठिकाणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित विभागांना तसे निर्देश देखील दिले आहेत.शहरी भागात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे तसेच शहरी भागात होणारे सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर नदी अथवा तलावामध्ये सोडले जाते. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पिण्याच्या वापरा व्यतिरिक्त पुनर्वापर केल्यास पिण्याच्या पाण्याची बचत होऊन तितक्याच क्षमतेचे पाणी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

पाण्याचा पुनर्वापर केल्याने तयार होणारे सांडपाणीदेखील कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ भारत’ व ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या आढावा बैठकीमध्ये आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित विभागांना पाण्याच्या पुनर्वापरासंदर्भात अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत याबाबत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्वतंत्र परिपत्रक निर्गत केले आहे.

परिपत्रकात निर्देशित केल्यानुसार, उद्यान विषयक कामांना प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यात यावे. याकरिता मैलाशुध्दीकरण केंद्राजवळील उद्यानांना या पाण्याचा पुरवठा नलीकेद्वारे तर इतर ठिकाणी टँकरद्वारे करण्यात यावा. उद्यान विषयक कामांकरीता यापुढे मोशी कचरा डेपो मध्ये तयार होणारे खत वापरण्यात यावे असे परिपत्रकात नमूद केले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईकरीता नेमण्यात आलेल्या खाजगी एजन्सींनी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जलनि:सारण विभागामार्फत ड्रेनेज लाईन स्वच्छतेसाठी रिसायकलींग मशीन आणि जेटींग मशीनचा वापर करण्यात येतो. याठिकाणी देखील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे संबंधित ठेकेदारास बंधनकारक करण्यात यावे असे आदेश जलनि:सारण विभागाला देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या विविध बांधकामांसाठी नजीकच्या मैला शुध्दीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक करणेबाबत स्थापत्य, प्रकल्प आणि बीआरटीएस विभागाला आदेशित केले आहे. अग्निशमन वाहनांकरीता देखील नजीकच्या मैला शुध्दीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश अग्निशमन विभागाला देण्यात आले आहे. महापालिकेमार्फत विविध विभागांमध्ये नेमण्यात येणा-या ठेकेदारांना महापालिका संबंधित कामांसाठी प्रक्रीया केलेल्या पाण्याचाच वापर करणे बंधनकारक करण्याबाबत संबंधित विभागांनी या ठेकेदारांसमवेत सामंजस्य करार करावा असे परिपत्रकात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button