TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञान वापरा : प्रवीण तरडे

पुणे बिझनेस स्कूल येथे ऍग्री वाईज - २०२३ परिषद संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ३ एप्रिल २०२३) युवकांनी शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, येणारा काळ शेतीचा सुवर्णकाळ असेल असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पुणे बिझनेस स्कूल (पीबीएस) मध्ये शनिवारी झालेल्या ऍग्री वाईज – २०२३ या शेतीविषयक राष्ट्रीय परिषदे उद्घाटन प्रसंगी तरडे बोलत होते. ‘रोल ऑफ युथ ईन ऍग्रीकल्चर’ हा या परिषदेचा विषय होता.
शेती आणि शेतीविषयक व्यावसायिक उपक्रम आणि संकल्पना यांना चालना देण्यासाठी दरवर्षी पुणे बिझनेस स्कूलच्या वतीने ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात येते. यंदाचे परिषदेचे हे दुसरे वर्ष होते.
प्रवीण तरडे पुढे म्हणाले की, आपल्या वाड – वडिलांनी जपलेली शेती आपण केवळ राखणदार म्हणून सांभाळून पुढच्या पिढीकडे सोपवणे हे आपले कर्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शेती आणि शेतीविषयक उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. आपण शेतीकडे भावनिक दृष्ट्या न पाहता व्यवसाय म्हणून बघण्याची आवश्यकता आहे. माझ्या कडील चित्रपट माध्यमातून देखील मी याच बाबींचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर देश टिकेल. अगदी ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐन जिन्नस कर्ज – पद्धती सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. सध्याच्या सरकारने या मधून प्रेरणा घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत आणि सर्वात महत्त्वाचे ही ऐन जिन्नस कर्ज – पद्धतीचा शालेय इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात यावा यासाठी मी पाठपुरावा करणार आहे असेही तरडे यांनी सांगितले.
देशभरातील नामांकित अनेक बहुराष्ट्रीय शेती विषयक कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी या परिषदेस उपस्थित होते. या मध्ये प्रामुख्याने अदवंटा लिमिटेड, सिजेंटा, धानुका, ईटीजी, कारगिल, डीहात, मार्केट्स अँड मार्केट्स, कोरोमंडल, बायोस्टॅड, एचडीएफसी बँक, आयआयसी बँक, फ्युचर मार्केट इनसाइट्स, एफएमसी यांचा समावेश होता. विशेषतः नॅनोटेक्नॉलॉजी आणि पेस्टीसाईड इंडस्ट्री बद्दल परिषदेमधील चर्चा सत्राला विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. विशाल भोर, अभिजित जगदाळे, निशिकांत यादव, जितेंद्र आखाडे, विक्रम भंडारी, डॉ. श्रद्धा कुलकर्णी या कॉर्पोरेट प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पीसीईटीचे अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पुणे बिझनेस स्कूलचे संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता अकॅडेमिक्स डॉ. मंजू पुनिया चोप्रा, डी. वाय. पाटील बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता डॉ. अभिजित ठाणगे पाटील, प्रा.श्यामराव माळी (एलएमके कॉलेज कडेगाव), प्रा. पल्लवी भोसले, प्रा. श्रीराम शिंपे (व्ही.पी. कॉलेज बारामती), प्रा. परमेश्वर बनसोडे (ए.बी.एम. कॉलेज नारायणगाव) यांच्यासह देशभरातून ५०० विद्यार्थी उपस्थित होते. प्रवीण तरडे यांची मुलाखत सूत्रसंचालक विनोद सातव यांनी घेतली. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न होऊन परिषदेचा समारोप झाला. संयोजक म्हणून प्रा. सागर लोखंडे यांनी जबाबदारी पार पाडली. स्वयंसेवक विद्यार्थी, पुणे बिझनेस स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button