breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

UP चा नेता राज्यावर लादला, कार्यकर्त्यांवर अन्याय, काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : काँग्रेस पक्षाने इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेचं तिकीट दिल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची खदखद समोर आली आहे. विदर्भातील महत्त्वाचे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे देशमुखांनी राजीनामा पाठवला आहे. राज्यसभेवर पाठवायला महाराष्ट्रात दुसरा कुणी नेता नव्हता का? असा सवाल त्यांनी केला आहे.

राज्यात अनेक नेते असताना काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातील ३४ वर्षीय इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तसेच तरुण नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याच नाराजीतून आशिष देशमुख यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. “अनेक कर्तृत्ववान नेते असूनही पक्षाने येथील नेत्यांचा विचार केला नाही. मला राज्यसभेचं आश्वासन देऊनही पक्षाने ते पूर्ण केलं नाही”, अशी खंत आशिष देशमुख यांनी बोलून दाखवली.

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगडी (उत्तर प्रदेश) यांना लादल्यामुळे मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे, अशी खंत व्यक्त करत आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला असला तरी मी पक्षाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून मी पक्षाचं काम करणार असल्याचं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.

  • महाराष्ट्रातून राज्यसभेची लॉटरी लागलेले इम्रान प्रतापगढी कोण?

मोहम्मद इम्रान प्रतापगढी हे उर्दू भाषिक कवी आहेत. ते उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आहेत. भारत आणि जगाच्या इतर भागांतील मुस्लिम अनुभव आणि अस्मिता यांचे वर्णन करणार्‍या निषेधात्मक काव्यासाठी इम्रान प्रतापगढी ओळखले जातात. ते विशेषतः “मदरसा” आणि “हाँ मै कश्मीर हूं” या उर्दू नझ्मसाठी लोकप्रिय आहेत.

इम्रान प्रतापगढी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र त्यांचा दणकून पराभव झाला होता. समाजवादी पक्षाचे उमेदवार ६ लाख ४९ हजार ५३८ मतांनी विजयी झाले, मात्र प्रतापगढी तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले. त्यांना केवळ ५९ हजार १९८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर ३ जून २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रतापगढी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभेवर प्रतापगढींचं पुनर्वसन होताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button