अॅनिमेशन क्षेत्रात अजूनही कुशल मनुष्यबळाची आवश्यकता : संजय खिवंसरा
![Still need of skilled manpower in animation sector: Sanjay Khivansara](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/International-Animatnation-Day-780x470.jpeg)
- आसिफा इंडिया सेवाभावी संस्थेच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन
पुणे : आकाशाची उंची आणि समुद्राची खोली यांसारखे विशाल अँनिमेशन क्षेत्र आहे. तुम्ही तुमची कल्पकता वापरून स्वतःला या क्षेत्रात सिद्ध करू शकता. मात्र अजूनही हे क्षेत्र खूप मर्यादित असून या क्षेत्राच्या विकासासाठी अजूनही कुशल मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे या क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी अजूनही चांगला ‘स्कोप’ आहे, असा सल्ला आसिफा इंडियाचे चेयरमन संजय खिवंसरा यांनी बोलताना दिला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/International-Animatnation-Day-2-1024x682.jpeg)
आसिफा इंडिया ही अँनिमेशन क्षेत्रातील विद्यार्थ्याना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी सेवाभावी संस्था असून संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अँनिमेशन दिनाच्या निमित्ताने चर्चासत्राचे आयोजन आझम कॅम्पस येथील असेम्ब्ली हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्यासह डॉ. ऋषि आचार्य, अंकित जैन, नीतिशा जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या अंतर्गत आसिफा इंडियाच्या वतीने भारतातील १४ शहरांमध्ये अशा प्रकारच्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या अँनिमेशन शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याना त्यांचा कार्यक्षेत्राची ओळख व्हावी, सध्याचा कोणत्या प्रकारचे ट्रेंड्स सुरु आहेत अशा सर्वच बाबींची माहिती आसिफा इंडीयाच्या माध्यमातून करून देण्यात आली. अँनिमेशनमध्ये असणारे गेमिंग, व्हीएफएक्स, ३डी व्हिज्यूवलायझेशन, एआर, व्हीआर अशा अनिमेशन क्षेत्रातील विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या चर्चासत्रामध्ये राजदीप पॉल, डीएनइजीचे विभागप्रमुख मनोज बारहाते, व्हीएफएक्स अँड अँनिमेशनचे कार्यकारी निर्माते सुभजीत सरकार, यूबीसॉफ्टचे श्रेयस पारीख यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना अँनिमेशन क्षेत्रातील विविध पैलू उघडून दाखविले. या उपक्रमासाठी पुण्यातील अँनिमेशनचे प्रशिक्षण देणारी सर्वच महाविद्यालये सहभागी झाली होती.