देशभरात मान्सूनचा दुसरा टप्पा सुरू : महाराष्ट्रात ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
![Second phase of Monsoon begins across the country: Warning of heavy rain for 3 days in Maharashtra, red alert for 'these' districts including Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Second-phase-of-Monsoon-begins-across-the-country.png)
मुंबई : देशभरात मान्सूनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशात भारतीय हवामान खात्याने ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्येपुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम विभागासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व भागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही रत्नागिरी, पुणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा इशारा
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.