शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर; भाजपा आमदार महेश लांडगे यांनी घेतली भेट
![Sambhaji Bhide, founder of Shiv Pratishthan Hindustan, is stable; BJP MLA Mahesh Landage called on him](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/शिवप्रतिष्ठान-हिंदुस्थानचे-संस्थापक-संभाजी-भिडे-यांची-प्रकृती-स्थिर-भाजपा-आमदार.jpg)
राज्यातील संस्था, संघटनांचे प्रतिनिधी सांगलीत दाखल
पिंपरी : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर असून, राज्यातील अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी सांगलीत दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनीही भिडे यांची भेट घेतली आणि डॉक्टरांसोबत चर्चा करुन प्रकृतीची विचारपूस केली.
गेल्या आठवड्यात संभाजी भिडे गुरुजी हे सायकलवरून गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपण चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या खुब्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉ. देशपांडे यांच्या नियंत्रणात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी भिडे यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी संताजी घोरपडे, उमेश गुड्डी, सर्वेक्ष पुराणिक, सांगली भाजपाचे पदाधिकारी शुभम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राहुल बोलाज म्हणाले की, शिवप्रतिष्ठान ही गुरूजींची संघटना आहे. राज्यभरात असंख्य धारकरी आहेत. राजकीय हेतूने अनेकांनी गुरूजींच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी रुग्णालयात येणे टाळले. मात्र, आमदार लांडगे आवर्जुन सांगलीला आले. गेल्या १२-१३ वर्षांपासून गुरूजी आणि आमदार लांडगे यांचे कौटुंबिक नाते आहे. सांगली-कोल्हापूरला आल्यानंतर लांडगे निश्चितपणे गुरूजींच्या भेटीला येत असतात. तसेच, गुरूजी पुण्यात गेल्यानंतर लांडगे यांना संपर्क करतात किंवा अनेकदा घरीही भेट देतात. आमदार लांडगे यांची गुरूजींप्रती आत्मियता आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय भिडे गुरुजी यांच्यावर सांगलीमधील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रुग्णालयात आज गुरुजींची भेट घेतली व संबंधित डॉक्टरांच्या टीम सोबत चर्चा केली. लवकरच गुरूजी आपले कार्य पूर्ववत सुरू ठेवतील, असा विश्वास आहे.