Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आता आरटीओद्वारे व्यापक मोहीम

प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांची ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम बासनात गुंडाळली जात असताना आता प्रादेशिक परिवहन विभागाने हेल्मेट सक्तीचा आग्रह धरला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाने हेल्मेट परिधान करूनच यावे, यासाठी आरटीओद्वारे व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे.

परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. राज्यात वाहन अपघातांची आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. बहुतांश मोटारसायकलस्वार हेल्मेट परिधान न करताच वाहने चालवितात. त्यामुळे अपघात झाल्यास मृत्यू ओढवतो. सरकारी कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक हेल्मेट परिधान न करताच येत असतात. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे नागरिकांनी पालन करावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करा, अशा सूचना ढाकणे यांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालये, शैक्षणिक व अन्य संस्थांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी, नागरिक विनाहेल्मेट आढळून आले तर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग तसेच स्थानिक पोलिस यंत्रणेमार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

२०१५ मध्येच अंमलबजावणी

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी व्हावे यासाठी नाशिकचे तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनीही अशा प्रकारचे परिपत्रक २०१५ मध्ये काढले होते. सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक मोटारसायकलस्वाराने हेल्मेट परिधान करूनच यावे, असे आवाहन त्याद्वारे करण्यात आले होते. काही दिवस या मोहिमेला यशही मिळाले. परंतु, अन्य सरकारी कार्यालयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने हा उपक्रम गुंडाळला गेला. नाशिकमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात आलेला हा उपक्रम आता राज्यात राबविण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button