विधान परिषद निवडणूक : काँग्रेसकडून भाई जगताप अन् हंडोरेंना विधान परिषदेवर संधी
![bhai Jagatap- chandrakant handore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/bhai-Jagatap-chandrakant-handore.jpeg)
राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसनंही यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांनी विधान परिषदेची संधी दिली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार मुंबईतील आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. (Legislative Council Election News)
काँग्रेसनं (Congress) विधान परिषदेसाठी दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) हे भीमशक्ती संघटनेचे नेते आहेत. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेलाही डावलण्यात आलं होतं. आता त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली आहे. हंडोरे हे मुंबईतील चेंबूर मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा इशारा दिला होता.
भाई जगताप (Bhai Jagtap) हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून ते ओळखले जातात. आगामी महापालिका निवडणुकीआधी भाई जगताप यांना बळ देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसनं त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देऊन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खेळी खेळल्याचं मानलं जात आहे. याचबरोबर काँग्रेसनं उमेदवारांची निवड करताना दोन्ही नेते मुंबईतीलच निवडले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आजच अर्ज भरणार आहेत.
विधान परिषदेसाठी 9 जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते (शिवसेना), प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह (सर्व भाजप), संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे. विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल तर 27 मतांची आवश्यकता असणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे दोन सदस्य कमी निवडून येतील. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 53, शिवसेना (Shivsena) 56 आणि कॉंग्रेसचे (Congress) 44 आमदार आहेत.