कालीचरण महाराज पुन्हा वादात; इस्लाम धर्माविषयी म्हणाला…
![Kalicharan Maharaj again in dispute; Said about Islam ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Kalicharan-Maharaj-again-in-dispute-Said-about-Islam-....jpg)
नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून वादात सापडलेल्या कालीचरण महाराज याने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मुसलमानांनी हिंदूंची ५ लाख प्रार्थनास्थळे फोडली. ती मिळवणे गरजेचं आहे. मुस्लिमांचे १०० टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं. हिंदू मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये अडकला आहे. इस्लाम हा धर्मच नाही. धर्म फक्त एकच आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म,’ असं कालीचरण याने म्हटलं आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या कालीचरण महाराज याने ग्रामदैवत भद्रकालीचे काल रात्री दर्शन घेवून आरती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना कालीचरणने राजकारणावरही भाष्य केलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशाला तारतील. हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानच आहे. मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे. जो हिंदू हिताचं बोलेल त्याला जाहीर पाठिंबा असेल,’ असं कालीचरणने म्हटलं आहे.
शरद पवारांविषयी काय म्हणाला कालीचरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार होते. मात्र, त्यांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. ‘मी आज नॉनव्हेज खाल्ले असल्याने मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नाही’, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटल्याचं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. याविषयी प्रश्न विचारला असता कालीचरण महाराज याने प्रतिक्रिया दिली आहे. ‘शरद पवारांचे वैयक्तिक आयुष्य आहे. मात्र आता सोशल मीडियामुळे प्रत्येक नेत्याची भूमिका लोकांना कळते,’ असं त्याने म्हटलं आहे.