प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजप उमेदवारांना नागरिकांचा प्रचंड उस्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभाग क्रमांक १० मधील भाजप उमेदवार श्रीमती अनुराधाताई गणपत गोरखे, श्री. कुशाग्र अशोक कदम, श्री. तुषार रघुनाथ हिंगे यांच्या सुरू असलेल्या प्रचारामध्ये भाजप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
उमेदवारांनी संपूर्ण प्रभागात पदयात्रा, घरभेटी आणि गाठीभेटींच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला. प्रत्येक गल्ली, वस्ती आणि सोसायटीमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना ऐकून घेण्यात आल्या. चारही गटांतील उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे संघटनात्मक ताकद अधिक ठळकपणे दिसून आली.
हेही वाचा – एकनाथ शिंदेच्या लाडक्या बहिणी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी लाडक्या बहिणी मैदानात

प्रचारादरम्यान स्थानिक विकासकामे, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर विशेष भर देण्यात आला. मागील काळात केलेली विकासकामे आणि पुढील काळातील ठोस विकास आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात आला.
‘आम्ही केवळ आश्वासनांवर नव्हे, तर केलेल्या कामांच्या बळावरच मतदारांपर्यंत जात आहोत,’ अशी आत्मविश्वासपूर्ण भावना उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली. नागरिकांनीही उमेदवारांना भरभरून प्रतिसाद देत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे चित्र या प्रचारातून स्पष्ट झाले.
“या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजप उमेदवारांच्या विजयाचा विश्वास असून, आगामी निवडणुकीत भाजपला किती हजार मतांनी दणदणीत यश मिळेल, याबाबत कार्यकर्त्यांसह नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.”



