तीन महिन्यांत सोनं सगळ्यात स्वस्त, चांदीही घसरली; वाचा नवे दर
नवी दिल्ली : जागतिक बाजारात सुरू असलेल्या दबावामुळे बुधवारी सकाळी सोन्याचा वायदा भाव तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर गेला आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशातही सोन्याचा भाव ५० हजारांच्या आसपास पोहोचला असून, चांदीचा भाव ६० हजारांच्या आसपास आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर(MCX), २४ कॅरेट सोन्याची किंमत सकाळी २२८ रुपयांनी घसरून ५०,३५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. सोन्याच्या किरकोळ वायदा किमतीची ही तीन महिन्यांतील निच्चांकी पातळी आहे. आजच्या व्यवहारात सोने ५०,४४५ रुपयांवर खुलले होते, पण मागणी कमी झाल्याने ते ०.४५ टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आले.
चांदीही झाली स्वस्त
सोन्याच्या किंमतींसह चांदीच्या किंमतीही घसरल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीचा वायदा भाव ६० हजाराच्या जवळपास पोहोचला आहे. सकाळी सुरुवातीला चांदी २८० रुपयांनी घसरून ६०,३३८ रुपये प्रति किलोग्रॅमवर विकली गेली. चांदीने आज ६०,५२५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार सुरू केला, पण विक्री वाढल्याने त्याची किंमत ०.४६ टक्क्यांनी घसरून ६०,३३८ वर आली.
जागतिक बाजारातही किंमती घसरल्या
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती घसरल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ०.३ टक्क्यांनी घसरून तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आली. इथं सोनं प्रति औंस १,८३२.०६ डॉलरवर विकलं गेलं. तर चांदीची स्पॉट किंमतही ०.१ टक्क्यांनी घसरून २१.२३ डॉलर प्रति औंस झाली.
का घसरल्या सोन्याच्या किंमती?
खरंतर, अमेरिकेतील रोख उत्पन्न २० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलं आहे. अशात चलनवाढीचे आकडे संध्याकाळी उशिरा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे याआधीही गुंतवणूकदारांकडून सावधगिरी बाळगत सोने-चांदीची खरेदी कमी केली. डॉलरच्या दरातही काहीशी घसरण झाली असून, त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. इतकंच नाहीतर IMF ने यावर्षी जागतिक विकास दर कमी केल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या खरेदीवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.