प्रभाग ८ मधील जलसाठा टाकीची सखोल स्वच्छता; नागरिकांच्या आरोग्यासाठी ‘‘संकल्प’’
मिशन- PCMC : भाजपाचे उमेदवार विलास मडिगेरी यांचा आश्वासन

पिंपरी-चिंचवड : प्रभाग ८, सेक्टर २, नाना-नानी पार्क येथील २५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची महापालिकेमार्फत सखोल स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने ही कारवाई राबवण्यात आली असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपाचे उमेदवार विलास हनुमंतराव मडिगेरी यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक- 2026 मध्ये इंद्रायणीनगर- भोसरी प्रभाग 8 मधून विलास मडिगेरी निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या ‘‘कमळ’’ चिन्हासमोरील बटन दाबून भाजपाला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
२००७ ते २०१२ या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात उभारण्यात आलेली ही पाण्याची टाकी आजही हजारो नागरिकांच्या घराघरात पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार आहे. “प्रत्येक नागरिकाला मुबलक आणि शुद्ध पाणी मिळाले पाहिजे,” या ध्येयातून या टाकीची उभारणी करण्यात आली होती, असे मडिगेरी यांनी सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून दर सहा महिन्यांनी या टाकीची जेट मशीन प्रेशरद्वारे स्वच्छता केली जाते. यासाठी २ एचपी क्षमतेच्या पंपाचा वापर करून टाकीतील संपूर्ण गाळ काढण्यात येतो. यावेळी ५ ते ६ स्वच्छता दूतांनी टाकीच्या आत उतरून मेहनतीने स्वच्छतेचे काम केले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावर बोलण्यासारखे बरेच, पण…; शिंदेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
यावेळी बोलताना मडिगेरी म्हणाले, “पाण्याची शुद्धता ही केवळ फिल्ट्रेशनपुरती मर्यादित नसून, ज्या ठिकाणी पाणी साठवले जाते त्या जागेची स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत आहे, मात्र ही स्वच्छतेची साखळी घराघरांपर्यंत पोहोचली पाहिजे.”
नागरिकांनीही आपल्या घरावरील पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ ठेवाव्यात, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून कुटुंबाचे संरक्षण करावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. “लोकांना स्वच्छ पाणी मिळणे हा केवळ सरकारी उपक्रम नसून, एका कुटुंबातील सदस्याने दुसऱ्या सदस्यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. स्वच्छ प्रभाग, आरोग्यदायी प्रभाग या संकल्पनेतूनच अशा उपक्रमांना सातत्य दिले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




