Uncategorized

‘ब्लॅक बॉक्स’ सापडला ! गूढ उलगडणार!

अहमदाबाद येथील अपघातग्रस्त विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' हाती आल्याने तपासाला दिशा आणि गती !

अहमदाबाद / नवी दिल्ली / मुंबई : अहमदाबादवरून लंडनला निघालेल्या प्रवासी विमानाचा भीषण आणि भयावह अपघात पाहून संपूर्ण जग हादरले आणि हळहळले. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचा उलगडाही होणे अवघड होऊन बसले आहे. अशातच या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडल्याने यापुढे तपासाची गती आणि दिशा योग्य दिशेने राहील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या अपघातात संदर्भातील अनेक महत्त्वाच्या बाबी आता उघडकीस येऊन एकूणच विमान अपघाताचे गूढ उकलणार आहे.

विमानाचा ‘डीव्हीआर’ देखील हात..

अहमदाबाद येथे झालेल्या ‘एअर इंडिया’च्या विमान अपघातानंतर जवळजवळ २७ तासांनी विमान अपघात तपास ब्युरोला (ए.ए.आय.बी.) विमानाचा ब्लॅक बॉक्स (डीएफडीआर) सापडला आहे. हा,’ब्लॅक बॉक्स’ बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या छतावर सापडला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विमान अपघाताचे नेमके कारण..

या ‘ब्लॅक बॉक्स’ च्या विश्लेषणातून अपघाताचे नेमके कारण आता शोधता येणे शक्य आहे आणि नागरिकांच्या मनात असलेला गोंधळ आणि संभ्रम त्यामुळे संपण्यास मदत होईल. अपघातस्थळी असलेल्या ढिगाऱ्यातून ‘डिजिटल व्हीडिओ रेकॉर्डर’ देखील सापडला आहे, असे तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत २७० मृतदेह बाहेर..

या विमान अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आतापर्यंत २७० मृतदेह हाती लागले आहेत. सात जणांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, ‘ड्रीमलाइनर’ विमानांची तपासणी करण्याचे आदेश ‘डीजीसीए’ ने दिले आहेत. ‘एअर इंडिया’ च्या ताफ्यात २६ बोईंग- ७८७-८ आणि ७ बोईंग-७८७-९ प्रकारची विमाने आहेत, अशी माहिती वृत्त संस्थेने दिली आहे.

मोदींनी घेतली एकमेव जिवंत व्यक्तीची भेट..

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात जिवंत राहिलेल्या एकमेव व्यक्तीची म्हणजे विश्वासकुमार रमेश यांची भेट घेतली, त्याची विचारपूस केली आणि संवाद साधला. तो ब्रिटिश नागरिक आहे. अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयात भेट देऊन विमान अपघातातील जखमी नागरिकांची विचारपूस नरेंद्र मोदी यांनी केली.

हेही वाचा – दक्षिण अफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत चोकर्सचा डाग पुसला

जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार..

अपघातातील २५ जखमींवर सिव्हिल रुग्णालयातील सी-१७ वॉर्डामध्ये उपचार सुरू आहेत. मोदी यांनी यावेळी डॉक्टरांशीही संवाद साधला. ज्या होस्टेलवर विमान जाऊन आदळले, तेथील अनेक डॉक्टर्सही जखमी असून त्यांच्याशीही मोदींनी प्रत्यक्ष संपर्क साधून विचारपूस केली.

तपास यंत्रणा ‘ॲक्शन मोड’ वर!

विविध केंद्रीय तपास संस्थांनी विमान दुर्घटनास्थळाला भेट दिली. राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) इतर केंद्रीय तपास संस्थांनी विमान अपघाताच्या स्थळाला भेट दिली. विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष तसेच विमान ज्या इमारतीवर कोसळले, तिची नासधूस झाल्याने पसरलेला ढिगारा या गोष्टी तेथून हटविण्यात आल्या. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याही मृतदेहाची ओळख अजून पटू शकलेली नाही. मृतदेह ताब्यात मिळावेत म्हणून अनेक नातेवाईकांची डी. एन. ए. चाचणी सुद्धा करण्यात आली आहे.

अपघातस्थळाची मोदींकडून पाहणी

‘एअर इंडिया’ चे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, त्या अपघातस्थळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली. त्यापूर्वी, अपघात झाला त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील पाहणी केली होती. या दोन्ही नेत्यांनी संबंधित परिसरातील नागरिक आणि अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि शक्य तेवढी माहिती जाणून घेतली. आतापर्यंत अपघातग्रस्तांपैकी १९२ कुटुंबांचे डी.एन.ए.नमुने गोळा करण्यात आले आहेत.

दुसऱ्या विमानाचे फुकेतमध्ये इमर्जन्सी लँडिंग

दरम्यान, दिल्लीकडे येणाऱ्या ‘एअर इंडिया’ च्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून थायलंडच्या फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षित असल्याचे यावेळी सिद्ध झाले. विमानतळावर उतरल्यानंतर त्याची अनिवार्य सुरक्षा चाचणी केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. इमर्जन्सी लँडिंग केलेल्या एअर इंडियाच्या ‘एआय ३७९’ विमानात १५६ पेक्षा अधिक प्रवासी होते. दिल्लीला येण्यासाठी या विमानाने उड्डाण केल्यांनतर काही वेळात सुरक्षा अलर्ट मिळाला. त्यानंतर विमानाच्या मार्गात बदल करत फुकेत येथे विमानाचे लँडिंग करण्यात आले, असे सांगण्यात आले.

मे डे’ कॉल म्हणजे नेमके असते तरी काय?

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील अनुभवी पायलटने ए टी सी म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला तातडीच्या मदतीचा “मे-डे” कॉल दिला होता, असे संवाद विमान दुर्घटनेनंतर सारखे ऐकू येत होते. ‘मे डे ’ कॉल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केलेला आपत्कालीन संदेश, जो पायलट किंवा जहाजाचा कप्तान अत्यंत गंभीर आणि जीवघेण्या संकटाच्या वेळी एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा जवळच्या विमानांना देतो. हा कॉल पायलट रेडिओवर ‘ मे डे, मे डे, मे डे’ असे तीनदा उच्चारतो, जेणेकरून संभ्रम टळावा आणि सर्वांना ही आपत्कालीन परिस्थिती समजावी. त्यानंतर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येतात. इंजिन फेल्युअर, विमानात आग, अचानक नियंत्रण गमावणे, तांत्रिक बिघाड, किंवा वैद्यकीय आणीबाणी अशा जीवघेण्या परिस्थितीत हा कॉल दिला जातो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button