सरस्वती मंदिर संस्थेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

पुणे : शतक महोत्सव साजरा करणाऱ्या सरस्वती मंदिर संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. १९२० मध्ये या संस्थेची स्थापना झाली असून पुण्यातील बाजीराव रोडवर या संस्थेचे मुख्यालय दिमाखात उभे आहे. संस्थेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम नियमितपणे राबविले जातात. त्याचप्रमाणे संस्थेच्या रात्रीच्या शाळेला भरभरून प्रतिसाद असतो.
संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे यंदा माजी विद्यार्थी मेळाव्याचा उत्साह जरा जास्तच होता. विविध क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या काही माजी विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगतेही व्यक्त केली.

आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, बांधकाम व्यवसाय त्याचप्रमाणे पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी बजावणारे अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या दूरवरच्या शहरातून काही विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. शाळा सोडून ६०-७० वर्षे पूर्ण झालेले काही विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. शाळेच्या जुन्या आठवणी, शाळेतील काही शिक्षकांच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या आणि सर्व माजी विद्यार्थी त्या आठवणींमध्ये रमून गेले. सहभागी झालेले बहुतेक विद्यार्थी हे साठीच्या पुढील होते, त्यामुळे अनेकांच्या तब्येतीची विचारपूस, कोण कुठे असतो? काय करतो? या चर्चांना चांगलेच उधाण आले. दरवर्षी प्रजासत्ताकदिनी माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे वचन अनेकांनी दिले. संस्थेच्या वतीने ज्या नवनवीन प्रकल्पांमध्ये पुढाकार घेतला जाईल, त्यावेळी आर्थिकदृष्ट्या संस्थेच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासनही अनेकांनी दिले.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे, राम कोकणे, डॉ. न. म. जोशी हे यावेळी उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक कार्याध्यक्ष अनिल शिदोरे यांनी केले, सूत्रसंचालन अनिल बुचके यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश पोरवाल यांनी केले. विविध क्षेत्रात शानदार कर्तृत्व गाजवणाऱ्या अनिल बेलकर, रजनीश मळेकर, दीनबंधू उपासनी, डॉ. ललिता बेंद्रे, संजीव शाळगावकर , स्वाती वाडकर, अरुणा देव -बेंद्रे या माजी विद्यार्थ्यांना या वेळी गौरवण्यात आले.