पिंपरी चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार अजितदादा – आमदार रोहित पवार
राष्ट्रवादीच्या प्रभाग १६ मधील रॅली पाहून रोहित पवारांचा विजयाचा आत्मविश्वास

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा कोणताही योगायोग नसून दूरदृष्टी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ठोस नेतृत्वाचा परिणाम आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पायाभूत सुविधा सक्षम झाल्या असून, शरद पवार केंद्रात असताना मिळालेल्या भरघोस निधीमुळेच शहराचा चेहरामोहरा बदलला, असे ठाम प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक १६ मधील उमेदवारांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभाग १६ चे पॅनेल प्रमुख व सर्वसाधारण गट ‘ड’चे उमेदवार माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ‘ब’ गटाच्या उमेदवार जयश्री भोंडवे, सर्वसाधारण महिला ‘क’ गटाच्या आशा भोंडवे आणि अनुसूचित जाती ‘अ’ गटाच्या श्रेया तरस–गायकवाड यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.
रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून रोहित पवार म्हणाले, “एवढ्या मोठ्या जनसमर्थनानंतर विजयाचा गुलाल आजच उधळायला हरकत नाही.” त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली.
ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि महिलांचा मोठा सहभाग यामुळे संपूर्ण रॅलीत परिवर्तनाची चाहूल जाणवत होती. ठिकठिकाणी उमेदवारांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
नागरी प्रश्नांवर थेट भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, शहरातील वाहतूक कोंडी गंभीर बनली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून, ही नागरिकांनी स्वतः हाती घेतलेली लढाई आहे.
हेही वाचा – पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग 28 मध्ये भाजपाची उद्या प्रचार पदयात्रा

युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, आयटी कंपन्या राज्याबाहेर गेल्याने युवकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. याच कारणामुळे आयटी क्षेत्रातील तरुण मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले असून, या प्रश्नाला दिशा देण्याची क्षमता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपवर थेट हल्लाबोल करताना त्यांनी रस्त्यांच्या कामातील कथित गैरव्यवहार, कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना तिकीट देण्यावर टीका केली. चिंचवडसह भोसरीचाही समतोल विकास हवा असेल, तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच संधी द्यावी लागेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
यावेळी माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “मतदार म्हणजेच माझे आई-वडील आहेत. रोहित दादा आणि अजित दादा वेगळे नाहीत. ग्रामीण भागातील मुले आज आयटी क्षेत्रात कार्यरत असून त्यांना आपल्या मूळ पक्षाची ओळख आहे. म्हणूनच ते आज मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.”
या रॅलीतून पिंपरी-चिंचवडमध्ये परिवर्तनाची नांदी झाली असून, विकास, पारदर्शकता आणि युवकांच्या भविष्यासाठी नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले.



