Ajit Pawar : आज मी राज्याचा उपमु… अजितदादा बोलता-बोलता अडखळले, मग…
बारामती : सत्तांतर झाल्यानंतर नेत्यांची पदं बदलतात, मात्र मोठ्या कालावधीसाठी तोंडात बसलेली नावं बदलण्यास वेळ लागतो. याची उदाहरणं अनेकदा आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळत असतात. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या बाबतीतही असाच काहीसा किस्सा घडल्याचं दिसलं. सवयीप्रमाणे दादा स्वतःचा उल्लेख राज्याचे उपमुख्यमंत्री असा करत होते, पण अर्ध्या सेकंदातच त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी विरोधी पक्ष नेते असं म्हणत सावरुन धरलं.
असं काय घडलं?
अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी त्यांना परमबीर सिंह वसुली प्रकरणात निलंबित डीसीपी पराग मनेरे यांचं निलंबन रद्द करुन त्यांना पुन्हा सेवेत घेतल्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना “यासंदर्भात मला काही माहिती नाही. मी कालपासून दौऱ्यावर आहे. मी मुंबईत गेल्यानंतर त्याबाबत माहिती घेईन. आज मी राज्याचा उपमु… विरोधी पक्ष नेता म्हणून तुमच्याशी बोलत आहे. त्यामुळे पूर्ण माहिती घेऊन याबाबत बोलणे जास्त उचित ठरेल. राज्यकर्ते बदलत असतात. सरकारमध्ये काम करत असताना कायदा, नियम, संविधानाच्या अधीन राहून प्रत्येकाने काम केले पाहिजे, या विचाराचा मी आहे” असे अजित पवार म्हणाले.
शिंदे सरकारवर टीका करताना अजित पवार पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अद्याप खातेवाटप केलेले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. कुठं घोडं पेंड खातंय हेच कळायला मार्ग नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना भेटत आहोत. प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर त्यांना ही सांगत आहोत. मागील एक महिन्यांपासून एखाद्या विभागातील काम करायचं म्हटलं तर अधिकाऱ्यांनाही काही समजत नाही. अशी सध्याची अवस्था झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.
पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यामध्ये असते. आता ऑगस्ट सुरू झाला असताना त्यांना मुहूर्त मिळेना की कुठून ग्रीन सिग्नल मिळेना का…त्यांच्या एक वाक्य तर होईना मंत्रिमंडळ करायला ते कशाला घाबरतात हे समजायला मार्ग नाही. असे म्हणत पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत करण्यासाठी तात्काळ मंत्रिमंडळ स्थापन करून अधिवेशन बोलवून मदत करण्यात यावी असे राज्यपालांना भेटून सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.