गर्भवती महिलेची परवड, आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा व्हिडिओ
पालघर : डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणारं मोदी सरकार, महाराष्ट्राचं राज्य सरकार, पालघर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला सुरू असलेल्या मुसळधार पावसात असह्य वेदना घेऊन तब्बल दीड किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे.
मोखाडा तालुक्यातील बोटोशी गावठाणातील सविता नावळे (वय २६) या महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. मात्र, गावात रस्ता नसल्याने आणि कोणतेच वाहन गावापर्यंत पोहोचत नसल्याने गावातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत सविता नावळे या गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. गावात कोणतेही वाहन आणि रुग्णवाहिका येत नसल्याने त्याचप्रमाणे मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात या गर्भवती महिलेला तब्बल दीड किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे. अखेर मुख्य रस्ता गाठल्यावर या मुख्य रस्त्यावरून या महिलेला रुग्णवाहिकेतून खोडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असून या मातेची सुरक्षित प्रसूती झाली असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
त्यानंतर असाच एक पालघर मधील सोमटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालक गरोदर मातासाठी देवदूत ठरला आहे. पालघर मधील बऱ्हाणपूर वणीपाडा येथील गरोदर माता प्रतिभा डोंगरकर या महिलेला प्रसूतीच्या असह्य वेदना होऊ लागल्या. जजनी सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत तातडीने रुग्णवाहिका प्रतिभा डोंगरकर यांच्या घरी पोहचली. मात्र, जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता.
मुसळधार पाऊस सुरू असताना असे असताना गरोदर मातेला वेळेत उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका चालक वसंत गुरोडा यांनी रस्त्याचा आणि पाण्याचा योग्य अंदाज घेत गावाचा संपर्क तुटण्याआधीच रुग्णवाहिका पाण्यातून बाहेर काढत गरोदर मातेला रुग्णालयात पोहचवलं. वेळेत रुग्णालयात पोहचल्याने त्या मातेचा जीव वाचला असून रुग्णवाहिका चालक वसंत गुरोडा यांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.