मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच पॉवरचा दुरुपयोग, हनुमानाने त्यांना सद्बुद्धी द्यावी – नवनीत राणा
![Abuse of power by CM's order, Hanuman should give them wisdom - Navneet Rana](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Abuse-of-power-by-CMs-order-Hanuman-should-give-them-wisdom-Navneet-Rana.png)
नागपूर: राज्यात हनुमान चालिसा वाद काही संपायला तयार नाही. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज ३६ दिवसांनंतर राज्यात परतले. राज्यात येऊन त्यांनी नागपुरातील हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा पठण केलं. यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. “राज्यात जबरदस्ती आणि गुंडशाही सुरुये. पॉवरचा दुरुपयोग केला जात आहे. मी संकटमोचकाकडे प्रार्थना करेन की त्यांनी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी महाराष्ट्राचं भलं करावं”, असं म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात
“महाराष्ट्रात राम आणि हनुमानाचा का इतका विरोध आहे? ज्या पद्धतीने दिल्लीत आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं, रॅली काढली, आरती केली, तिथे काहीही त्रास झाला नाही. महाराष्ट्रात विरोध का कळत नाही. माझ्या महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे, त्यासाठी आज हनुमान चालिसा पठण मी करतेय. त्यानंतर शेवटी अमरावतीत मोठी आरती करणार आहे”, अशी माहिती नवनीत राणांनी दिली.
“कितीही विरोध केला तरी देवाच्या नावाला विरोध का करताय. राज्यात ज्या पद्धतीने नकारात्मकता या लोकांनी पसरवली आहे रामाबद्दल आणि हनुमानाबद्दल, दुसऱ्या कुठल्याही राज्यात असं नाहीये. ३६ दिवसांनंतर जेव्हा आपण राज्यात येतो आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी जातो, तेव्हा रामाचा आणि हनुमानाचा इतका विरोध राज्यात का आहे. उद्धव ठाकरेंना दुसरं काम नाहीये का, हा शनी लवकरात लवकर दूर झाला पाहिजे यासाठी मी दर दिवशी हनुमान चालिसा आणि आराधना करेन”, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
पॉवरचा दुरूपयोग हा फक्त महाराष्ट्रात – नवनीत राणा
“आम्ही जर हे दिखाव्यासाठी करत असू तर तुम्ही दिखाव्यासाठीही करत नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकदा हनुमान चालिसा वाचून एकदा दिखावा करावा पण करा. ज्या पद्धतीने इथे बंदोबस्त आहे, तुम्ही पाहू शकता कुठल्या पद्धतीने महाराष्ट्रात जबरदस्ती आणि गुंडशाही ज्याला म्हणू शकतो, पॉवरचा दुरूपयोग हा फक्त महाराष्ट्रात होत आहे. १०० टक्के मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच पॉवरचा दुरूपयोग केला जात आहे. मी हनुमानाला प्रार्थना करेन की मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी”, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.