१७ वर्षांचा मुलगा घरातच छापत होता बनावट नोटा; पोलिसांना सुगावा लागताच…
![A 17-year-old boy was printing fake notes at home; As soon as the police have a clue ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/A-17-year-old-boy-was-printing-fake-notes-at-home-As-soon-as-the-police-have-a-clue-....jpg)
ठाणेः बनावट नोटा विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका तरुणाला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने मुंब्य्रामधून अटक केली आहे. त्याच्याकडून शंभर रुपयांच्या २५० बनावट नोटा जप्त केल्या असून या बनावट नोटांच्या निर्मितीमागे चक्क एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा हात असल्याची धक्कादायक माहिती चौकशीमध्ये समोर आली. हा मुलगा घरातच बनावट नोटांची निर्मिती करत होता. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या घरी मारलेल्या छाप्यामध्ये देखील ९१ बनावट नोटा, नोटांच्या चित्रांचे पेपर, कटर, कोरे पेपर, लॅपटॉप आदी साहित्य मिळाले.
मुंब्रा बायपास रस्ता येथील वाय जंक्शन पुलाखाली सोमवारी सायंकाळी मोहमद जैद उर्फ बब्बू हा शंभर रुपये दराच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी विक्रीकरिता घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली. या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून मोहमद जैद चाँदबादशहा शेख या २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे २५०बनावट नोटा मिळाल्या. तो मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड परिसरात राहत असून या बनावट नोटांविषयी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर एक १७ वर्षांचा मुलगा राहत्या घरात बनावट नोटांची निर्मिती करत असल्याची माहिती पुढे आली. मुंब्रा येथील मुलाच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात लॅपटॉप, १०० रुपयांच्या एकच सिरीयल नंबर असलेल्या ९१ बनावट नोटा, नोटांचे चित्र असलेले नऊ पेपर, नोटांची कटिंग करण्यासाठी वापरण्यात आलेला कटर, लाकडी पॅड, पट्टी, ५० कोरे पेपर्स आदी साहित्य मिळाले. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेने मोहमद जैद चाँदबादशहा शेखला अटक केली. न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी दिली. तर, अल्पवयीन मुलालादेखील ताब्यात घेतले असल्याची त्यांनी माहिती दिली.
आरोपींनी यापूर्वी बनावट नोटांची निर्मिती करून नोटा चलनात आणल्या असण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा तपास युनिट एक करीत आहे. बनावट नोटांचे रॅकेट उघडीस आणून आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, पोलिस उप निरीक्षक किणी यांच्या पथकाने केली.
पाने पाण्यात टाकली
बनावट नोटांच्या या कारवाईदरम्यान पोलिसांची चाहूल लागताच अल्पवयीन मुलाने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ५०० रुपये दराच्या नोटांचे चित्र असलेली १५ पाने, २०० रुपये दराच्या नोटांचे चित्र असलेली नऊ पाने आणि १०० रुपये दरांच्या नोटांचे चित्र असलेली १६० पाने पाण्यात टाकली. त्यामुळे त्यावरील प्रिंट अस्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.