48 महिलांची फसवणूक; महिला बचत गटाची अध्यक्ष अटकेत
पुण्यातील48 महिलांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या महिला बचत गटाच्या दोन महिलांना पौड पोलिसांनी अटक केली. मुळशी तालुक्यातील मालेगावातील हा प्रकार आहे. पौड पोलिसांनी या प्रकरणी सविता भोलेनाथ घाग (वय 43) आणि स्वाती शिवाजी कदम (वय 35) या दोन महिलांना अटक केली आहे. मागील तीन वर्षांपासून महिला बचत गट सुरू होती.
मालेगाव येथील काही महिलांनी एकत्र येऊन तीन वर्षापूर्वी सियाराम या नावाने महिला बचत गट सुरू केला होता. त्यात कविता घाग अध्यक्ष तर स्वाती कदम या सचिव होत्या. या दोघींनी बचत गटातील 48 महिलांकडून दरमहा एक हजार रुपये गोळा केले होते. या महिलांकडून गोळा केलेले लाखो रुपये त्यांनी बँक खात्यात न ठेवता स्वतःकडेच ठेवले होते.
बचत गटातील इतर महिलांनी या दोघींना वारंवार बँकेत खाते उघडण्यासाठी सांगत होते. परंतु त्यांनी शेवटपर्यंत खाते उघडले नाही. मागील तीन वर्षात 48 महिलांचे 16 लाख 56 हजार रुपये जमा झाले. अखेर बचत गटातील इतर महिलांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटकही केली आहे.





