राऊत यांच्यानंतर आणखी एक शिवसेना नेता ‘ईडी’च्या रडारवर?
![Another Shivsena leader on radar of PMC Bank Scam Kirit Somayya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/pmc05-1.jpg)
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी वर्षा राऊत या काल चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. संजय राऊत यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने वृत्तानुसार हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी शिवसेनेचा खासदार राहिलेला नेता देखील यात असून, त्यांच्या कुटुंबाची देखील चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
ईडीच्या नोटीसनंतर वर्षा राऊत चौकशीसाठी काल हजर झाल्या होत्या. ईडीकडून त्यांची जवळपास 4 तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.