Uncategorized

मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | 18 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीचं जागावाटप कधी होणार? याबाबत माहिती दिली. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाहीय. भाजपने महाराष्ट्रातील 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पण उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही. काही जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पण एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत टेन्शन घेण्यासारखं नाही, अशी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमची विचारधारा सारखीच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“काही टेन्शन घेऊ नका. जागावाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल. महायुतीत कुठलाही विवाद नाही. काही चिंता करु नका. योग्यवेळी निर्णय होईल. या राज्यात 45 पारचा आकडा महायुतीचा येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात मजबुत होतील”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

“आता आचारसंहिता सुरु झालेली आहे. त्यामुळे आपली बऱ्याच दिवसांनी भेट होतेय. कारण मध्ये बरीच कामे, लोकार्पणाची अनेक कार्यक्रम पार पडली. आम्ही सर्व त्यामध्ये व्यवस्त होतो. महायुती सरकारने केलेले कामे आपल्यासमोर आहेत. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आघाडी घेतली. अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प झाले. मेट्रोचे अनेक उद्घाटन झाले. अनेक कामं प्रगतीपथावर आहेत. महाविकास आघाडीच्या काळात विकासकामांना ब्रेक लावण्यात आला. पण आम्ही युद्ध पातळीवर सर्व कामे सुरु केली. आपलं राज्य आज पहिल्या नंबरला आहे. आपलं जीडीपीमध्ये मोठं योगदान आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘केंद्राने आम्हाला पूर्ण पाठबळ दिलं’

“पहिल्या कॅबिनेटपासून ते शेवटच्या कॅबिनेटपर्यंत 500 निर्णय घेतले. एक पॉझिटीव्ही आणण्याचं काम आम्ही केलं आहे. महाराष्ट्र स्वच्छतेत एक नंबर आला. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचं योगदान आहे. मी मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार झालं आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत नक्की होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. केंद्राने आम्हाला पूर्ण पाठबळ दिलं आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. “महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले”, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

‘उबाठाच्या लोकांनी तिथे जाऊन माफी मागावी’

“इंडिया आघाडीची कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती. भानुमतीचा गुंदा तयार होता है तसं सर्वजण होते. लोकांनी हद्दपार केलेले सर्व काल एकत्र आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होतं की, धरुन बांधून आलेले लोक आहेत. उबाठाच्या लोकांनी तिथे जाऊन माफी मागायला हवं होतं. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या बरोबर बसावं लागतंय. काल एक शब्द बंद झाला, माझा तमाम हिंदू बंधू बघिणींनो, काल तो शब्द रद्द झाला. यावरुन लक्षात आलं बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धोरण हे सगळं सोडलं म्हणून आम्हाला त्यांना सोडण्याचा विचार करावा लागला”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलाय

“काल जे काही घडलं, अब की बार तडीपार, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेने आणि शिवसैनिकांनी केले आहे. इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथे आले ते मोदीजींना कसं तडीपार करु शकतात? नरेंद्र मोदींनी कामे करुन दाखवली”, असं शिंदे म्हणाले.

‘विश्वास गमावलेला विरोधी पक्ष’

“विश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे. त्यांच्याकडे नेते, नीती आणि अजेंडा नाही. त्यांच्या भाषणात फक्त मोदीद्वेष दिसत होता. फक्त व्यक्तीदोष दुसरं काही नव्हतं. तुम्ही 2014 ला चौकीदार चोर म्हणालात. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. ते साधं पंतप्रधान पदाचा उमेदवार दाखवू शकले नाहीत. राहुल गांधींनी हिंदू धर्माची शक्ती म्हटलं आहे. म्हणजे कोणती आमच्या साडेतीन शक्तीपीठांची शक्ती, नारीशक्तीला संपवण्याची ताकद त्यांच्यात आहे? एवढा मोठा राष्ट्रीय नेता पण त्यांच्या सभेला 500 लोकंही नव्हते. हिंदू धर्माची शक्ती संपवणारं अजून जगात जन्माला आलेला नाही. येत्या निवडणुकीत ही शक्ती त्यांना त्यांची जागा दाखवणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘आम्ही खरंच डिलर आहोत’

“जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले. उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले. त्यांना बोलायला फक्त पाच मिनिटे दिले. आम्ही छातीठोकपणे बोलत गेलो. आम्ही सत्तेसाठी भूमिका बदलणारे नाहीत. शिवसेनेला एकेकाळी शत्रू मांडणारे काँग्रेस ठाकरेंसोबत आहे. हे पॉलिटिकल क्रॉम्प्रमाईज होतं”, असं शिंदे म्हणाले. “आम्ही खरंच डिलर आहोत. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्येष्ठ, तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केले. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे आले. आता मोदींच्या काळात एकही घोटाळा आला नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“विजय शिवतारे मला भेटले. मी त्यांना सांगितलं आपली महाराष्ट्रात युती आहे. युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य आहे. महायुतीत आमचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मदत करणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button