‘आयएनएस विराट’ चे म्युझियममध्ये रुपांतर करण्यात यावे, प्रियंका चतुर्वेदींचे संरक्षणमंत्र्यांना पत्र
![Priyanka Chaturvedi writes to preserve INS Virat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Priyanka-Chaturvedi-writes-to-preserve-INS-Virat.jpeg)
मुंबई : विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटने जवळपास 30 वर्षे भारताची सेवा केली. आपल्या समुद्राचा आणि भारतीय नौदलाचा हा अभिमान आहे. त्याला भंगारात विकणे नक्कीच नौदलाच्या वारसासाठी धोकादायक असल्याचे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. आयएनएस विराटच्या जतनासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात या ऐतिहासिक युद्धनौकाचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यास महाराष्ट्रला आनंद होईल, असेही म्हटले आहे. नौदलातून निवृत्त झालेल्या आएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे. प्रियंका चतुर्वेदींनी राजनाथ सिंह यांना पत्र लिहून हे थांबविण्याची मागणी केली आहे.
चतुर्वेदी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गुजरात येथे ऐतिहासिक आयएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाल्याचे मी ऐकले आणि अतिव दुःख झाले. सन 2013 पर्यंत ३० वर्षे देशासाठी सेवा देणाऱ्या या ऐतिहासिक युद्धनौकेने दुसऱ्या महायुद्धातही महत्वाची भूमिका बजावली होती. ऑपरेशन ज्युपिटर आणि ऑपरेशन परक्रमामध्येही ही युद्धनौका तैनात होती.
भारताच्या नौदलाचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही ऐतिहासिक युद्धनौका नागरिकांसाठी अनमोल ठेवा आहे. त्यामुळे आयएनएस विराटचे म्युझियममध्ये रुपांतर करण्यात यावे, त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात यावे. यासाठी मंत्रालयाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चतुर्वेदी यांनी या ऐतिहासिक युद्धनौकाचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यास महाराष्ट्रला आनंद होईल, असेही म्हटले आहे.