आमदार ‘टीडीआर’ किंग तर प्राधिकरणाचे अध्यक्ष त्यांचे हस्तक

पिंपरी, (महाईन्यूज) – भाजपचे आमदार टीडीआर किंग आहेत. तर, त्यांचे हस्तक नवनगर प्राधिकरणाचे अध्यक्ष शेतकरी आणि बिल्डर यांच्यातील आर्थिक गणितांची जुळवाजुळव करत कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत, अशा शब्दांत भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी भाजप नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.
यासंदर्भात युवा मोर्चाचे उपाध्यक्ष काळभोर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील बाधित शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा मिळणे नियमाधीन आहे. गेली कित्येक दशके प्रलंबीत राहिलेला हा किचकट मुद्दा आपण मार्गी लावला आहे. मात्र, स्थानिक आमदार हे टीडीआर किंग आहेत. तर, त्यांचे शिष्य प्राधिकरणाचे अध्यक्ष हे शेतकरी आणि बिल्डर यांच्यात आर्थिक गणीतांची जुळवाजुळव करत ठाण मांडून बसले आहेत. हा प्रकार गंभीर असून याची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
- शेतक-यांचा साडेबारा टक्के परतावा मिळण्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही. त्यासंदर्भातील फाईल अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आहेत. असे आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे.
- सदाशिव खाडे, अध्यक्ष, प्राधिकरण





