TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दोन हजार बेस्ट बस दाखल होणार

मुंबई: येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईकरांच्या सेवेत बेस्टच्या आणखी दोन हजार बसगाड्या दाखल होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बसगाड्यांच्या परवान्याला मंजुरी देण्यात आली. आता या दोन हजार बसगाड्या सेवेत दाखल करण्याबाबत बेस्ट उपक्रमाकडून नियोजन करण्यात येणार आहे.

मुंबईकरांच्या सेवेत सध्या तीन हजार ६७९ हून अधिक बसगाड्या असून साध्या बसबरोबरच मिनी, मिडी आणि वातानुकूलित मोठ्या आकाराच्या बसचा त्यात समावेश आहे. उपक्रमाने येत्या काही वर्षांत बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या दहा हजारपर्यंत वाढविण्याचे उदिद्ष्ट निश्चित केले आहे. लवकरच ताफ्यात दुमजली वातानुकूलित बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. वातानुकूलित बस ऑक्टोबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. मात्र या बसची पुण्यात चाचणी सुरू असल्याने सेवेत दाखल होण्यास तिला विलंब होण्याची शक्यता आहे.

आता आणखी दोन हजार बसगाड्या ताफ्यात दाखल करण्यासाठी आवश्यक नव्या परवान्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे भविष्यात मुंबईकरांच्या सेवेसाठी अधिक बस धावतील आणि प्रवाशांचा प्रवास सुकर होईल, असे प्राधिकरणाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या वाढविण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडून परवाना मिळविणे आवश्यक असते. प्राधिकरणाने नवीन दोन हजार बसगाड्या चालवण्याच्या परवान्यास मंजुरी दिली आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकारच्या बस सेवेत दाखल करणे योग्य ठरेल याबाबतचा निर्णय बेस्ट उपक्रम घेणार आहे. त्यासाठी निविदा आणि अन्य कामांची प्रक्रियाही लवकरच उपक्रमाकडून राबविण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button