TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना अटक

धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे (२४), समुराम ऊर्फ सूर्या घसेन नरोटे (२२) असे अटक केलेल्या नक्षल्यांची नावे असून दोघेही धानोरा तालुक्यातील मोरचुल येथील रहिवासी आहेत, अशी माहिती गडचिरोली पोलिसांनी पत्रपरिषदेत दिली.

उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्र हद्दीत ७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस दलाकडून गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान दोन संशयीत व्यक्ती आढळून आले होते. त्यांची सखोल चौकशी केली असता ते नक्षली असल्याची खात्री पटली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यापैकी सनिराम हा ऑक्टोबर २०१५ साली टिपागड दलममध्ये दाखल झाला होता. जहाल नक्षली नेता जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून २०१८ पर्यंत तो कार्यरत होता. त्यानंतर ऑगस्ट २०१८ ते २०२० पर्यंत कंपनी १० मध्ये कार्यरत होता. सध्या तो पीपीसीएम म्हणून कंपनी १० मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर ८ लक्षांचे बक्षीस होते, तर समुराम ऊर्फ सुर्या हा जन मिलिशिया सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. दोन्ही नक्षल्यांचा हत्या, जाळपोळ, चकमक, अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

दोन वर्षात ५५ नक्षल्यांना कंठस्नान

गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दोन वर्षात पोलिसांनी एकूण ६६ लाखांचे बक्षीस असलेल्या १६ नक्षल्यांना अटक केली आहे. सव्वा कोटींचे बक्षीस असलेल्या १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, तर तब्बल ५५ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. या नक्षल्यांवर एकूण ४ कोटी १० लाखांचे बक्षीस होते. यात मागील वर्षी मरदिनटोला चकमकीत आनंद तेलतुंबडेसह मोठ्या नक्षल्यांच्या सहभाग आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button