ताज्या घडामोडीमुंबई

आजची अक्षय्य तृतीया सोन्यासाठी फलदायी?; जोरदार खरेदीची आशा

 मुंबई | प्रतिनिधी

मागील दोन वर्षे करोना संसर्ग, लॉकडाउन, मंदावलेली अर्थगती या साऱ्या पार्श्वभूमीवर आज, अक्षय्य तृतीया येत आहे. त्यामुळे ही अक्षय्य तृतीया खरोखरच सोन्याची असेल, असा विश्वास सर्वच सराफांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनेही सकारात्मक सूर आपल्या अहवालात लावला आहे.

सोन्याचा १० ग्रॅमसाठी भाव सोमवारी ५१,३६६ रुपये होता. परंतु यात स्थानिक कर, जीएसटी आणि घडणावळ मिळवल्यास हा भाव ५२,५०० रुपयांवर गेला आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे प्रादेशिक सीईओ सोमसुंदरम पीआर यांच्या मते, ही अक्षय्य तृतीया चांगली जाईल. परंतु सोन्याच्या किरकोळ किंमतीत सातत्याने होत असलेली वाढ हाच सोनेखरेदीतील मोठा अडसर ठरण्याची शक्यता आहे.

सोन्याची मागणी ही उत्पन्नानुसार वाढते असे दिसून आले आहे. लोकांचे उत्पन्न १ टक्का वाढल्यास सोन्याच्या मागणीतही १ टक्का वाढ होते. सोन्याच्या दीर्घकालीन मागणीवर नेहमीच उत्पन्नाचा परिणाम दिसून येतो. देशात मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित असते यावर मध्यमवर्गीयांचा विश्वास असल्यामुळे सोन्याच्या मागणीत उत्तरोत्तर वाढच दिसून येणार आहे.

पालशेतकर ज्वेलर्सचे संचालक महेश पालशेतकर यांनी मटाला सांगितले की, ग्राहकांना प्रत्यक्ष दालनांत आणण्यासाठी जुन्या ग्राहकांना आठवण करून देण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्टी आल्यामुळे प्रत्यक्ष सोने पाहून खरेदी करण्याकडे कल वाढेल. दागिने खरेदी करण्यापेक्षा सोन्याची नाणी आणि वळी अधिक विकली जातील, अशी अटकळ आहे. मंगळवारी सोन्याचा भाव साधारणतः ५२ हजार ते ५२,५०० पर्यंत राहील, असा अंदाजही पालशेतकर यांनी व्यक्त केला.

लॉकडाउन काळात अनेक नवे ग्राहक ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत, याकडे पीएनजी ज्वेलर्सच्या सौरभ गाडगीळ यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, या ग्राहकांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. यामुळे अक्षय्य तृतीयेला तरुणांचा ओढा अधिक असेल. यंदा ऑनलाइन खरेदी कमी होईल. महिन्याच्या सुरुवातीला अक्षय्य तृतीया आल्यामुळे लोकांच्या हातात पैसा आहे. २०२१मध्ये अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ४६ हजार रुपये होता. यावर्षी तो ५२ हजार राहण्याची शक्यता आहे.

सोन्याला पवित्र भावना जोडलेली असते. विशेष सणांसाठी किंवा विवाहानिमित्त भारतीय ग्राहक सोन्याची खरेदी करतो तेव्हा हे सोने तो प्रथ्यक्षच खरेदी करतो. यावेळी खरेदी करण्यात आलेल्या सोन्याला केवळ गुंतवणूक मूल्य नसते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या अक्षय्य तृतीयेला लग्नसराईसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जाईल, असा विश्वास वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे यांनी मटाकडे व्यक्त केला आहे.

विवाहांची रेलचेल

अक्षय्य तृतीयेला रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आली आहे. त्यामुळे सोनेखरेदीला चालना मिळणार आहे. सकाळपासून ग्राहकांची गर्दी असेल, असे गृहित धरले जात आहे. त्यातून यंदा सोन्याचा भाव उतरला आहे. २०१९मध्ये, लॉकडाउनपूर्वीच्या अक्षय्य तृतीयेला देशात २१ टन सोने विकले गेले होते. यावर्षी २५ टन सोन्याची विक्री होणे अपेक्षित आहे. त्यातून पुढील तीन महिन्यांत राज्यात सात ते आठ लाख विवाह आहेत. त्याची बेगमी म्हणूनही आज, मंगळवारी जोरदार खरेदीची अपेक्षा आहे.

– सौरभ गाडगीळ, संचालक, पीएनजी ज्वेलर्स

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button