breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

त्रिसदस्यीय पॅनेल! महापालिका निवडणुकीत 43 प्रभाग, 23 प्रभागात असणार दोन महिला नगरसेविका

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी निवडणूक त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने होणार असल्याचे निश्चित झाल्याने संदिग्धता संपली आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यास वेग दिला आहे. ढोबळ मनाने आरक्षणाचा विचार करता तीन सदस्यांचे 42 प्रभाग तर दोन सदस्यांचा 1 प्रभाग होणार आहे.

43 प्रभागांपैकी 23 प्रभागात दोन महिला तर एक पुरुष उमेदवार अशी विभागणी असणार आहे. 128 नगरसेवकांपैकी 62 पुरुष तर 66 महिला नगरसेविका असणार आहेत. दरम्यान, चार महिला नगरसेविकांची संख्या जास्त राहणार आहे, त्यामुळे त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीचा महिलांना फायदा होणार आहे.

राज्य सरकारने सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करत मुंबई वगळता 17 महापालिकांच्या निवडणुका तीनसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारच्या मंत्रीमंडळ बैठकीत तीन नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीनेच निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

त्याबाबतचा अध्यादेश स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे देखील पाठविण्यात आला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेची संदिग्धता संपली असून निवडणूक विभागाने कामाला गती दिली. तळवडे गावठाणापासून नव्याने प्रभाग तयार करण्यास सुरुवात झाली. सांगवीत प्रभाग रचनेचा शेवट होईल. सांगवीतील शेवटचा प्रभाग 2 सदस्यांचा राहू शकतो. 25 सदस्यांची समिती प्रभाग रचनेचे काम करत आहे. गुगलमॅपद्वारे सीमांकण केले जात आहे.

निवडणूक 2011 च्या जनगणेनुसार होणार आहे. त्यानुसार आराखडा तयार केला जात आहे. शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 692 आहे. त्यापैकी 13 लाख 50 हजार मतदार आहेत. मतदारनोंदणी सुरु असून 14 लाखापर्यंत मतदारसंख्या होऊ शकते. नगरसेवकांची संख्या 128 च राहणार आहे.

एकूण 3102 ब्लॉक आहेत. एका ब्लॉकमध्ये 400 ते 800 लोकसंख्या राहणार असून 150 घरांची मर्यादा आहे. 36 ते 44 हजार दरम्यान लोकसंख्येचा एक प्रभाग होईल. एका प्रभागात सुमारे 40 हजार लोकसंख्या राहील. 128 नगरसेवकसंख्येपैकी अनुसूचित जाती (एससी)साठी 20 जागा राखीव राहणार असून त्यात 10 महिला, 10 पुरुष असणार आहे. त्याचे प्रमाण 15.50 टक्के आहे.

तसेच, अनुसूचित जमाती (एसटी)साठी 3 जागा असून त्यात 2 महिला 1 पुरुष असणार आहे. त्याचे प्रमाण 2.34 टक्के आहे. ओबीसीसाठी 35 जागा असणार आहेत. त्यात 18 महिला आणि 17 पुरुष असणार असून त्याचे प्रमाण 27 टक्के आहे. उर्वरित जागा खुल्यागटासाठी असणार आहेत.

ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे काम पूर्ण होईल. त्यावर हरकती मागविल्या जातील. हरकतींवर सचिव दर्जाच्या अधिका-यांच्या उपस्थितीत सुनावणी घेतली जाईल. प्रारुप आराखड्याला निवडणूक आयोगाची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर अंतिम आराखडा प्रसिद्ध केला जाईल. आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणूक विभागाकडून दरम्यानच्या काळात आरक्षण सोडत होईल. डिसेंबरअखेर किंवा जानेवारी 22 च्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल. शहरात अंदाजे 2 हजार मतदार केंद्र होतील.

2002 मध्ये झाल्या होत्या तीनसदस्यीय पॅनेलनुसार निवडणूका!

पिंपरी – चिंचवड महापालिकेसाठी तीन सदस्यीय पॅनेल पद्धती नवीन नाही. 2002 मध्ये याच पद्धतीने निवडणूक पार पडली होती. त्यावेळी 105 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला 36 तर काँग्रेसला 32 जागांवर यश मिळाले होते. महापौरपद राष्ट्रवादीकडे तर उपमहापौरपद कॉग्रेसकडे असा फॉर्म्युला ठरला होता.

यानंतर 2007 मध्ये एकसदस्यीय वार्ड पद्धती अमलात आली. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. या पक्षाची एकहाती सत्ता आली. 2012 मध्ये दोन सदस्यीय पद्धतीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. तर, काँग्रेसकडे विरोधी पक्षाची जबाबदारी होती.

त्यानंतर सन 2017 मध्ये चारसदस्यीय पॅनेलनिहाय निवडणूक झाली. यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले. पिंपरी – चिंचवड महापालिकेमध्ये भाजपचे कमळ फुलले. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपने भगदाड पाडले. आता मात्र, भाजपच्या ताब्यातून महापालिका खेचण्याचे डावपेच राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आखले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button