TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘त्यांना’ मिळणार कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने; कुणाला, का आणि कशासाठी मिळणार ही वाहने वाचा…

नियमितपणे कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांसाठी स्वतंत्र कचरा गाडी उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. वरळी आणि वांद्रे पश्चिम परिसरातील सोसायट्यांसाठी प्रायोगिक तत्वावर कचरावाहू वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. वर्गीकरण केलेला ओला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करण्याबरोबरच या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देण्याची योजनाही लागू करण्यात येणार आहे.

स्वच्छ मुंबई अभियाना’निमित्त मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रायोगिक तत्वावर काही उपक्रम सुरू केले आहेत. कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्याचा ओला कचरा वाहून नेण्यासाठी स्वतंत्र गाड्या उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली. यासाठी मुंबईतील दोन प्रशासकीय विभागांची निवड करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. हा कचरा थेट कचराभूमीवर नेला जाणार आहे. वरळीतील ५०, तर खार, वांद्रे परिसरातील १५० सोसायट्यांना ही सुविधा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहे. नियमित कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांना महानगरपालिकेच्या योजनेनुसार मालमत्ता करात पाच टक्के सवलत मिळू शकणार आहे.

महानगरपालिकेच्या कचराभूमीची क्षमता संपुष्टात आली असून कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रतिदिन १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होत असलेल्या सोसायट्यांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले. २० हजार चौ. मी.पेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडावरील गृहसंकुल, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या सोसायट्या वा उपहारगृहे इत्यादींनी त्यांच्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करावे, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करावी असे बंधन महानगरपालिकेने २०१८ मध्ये घातले होते. त्यानुसार सोसायट्यांनी कचरा वर्गीकरणाला सुरुवातही केली होती. मात्र टाळेबंदीच्या काळात कचरा वर्गीकरणाची मोहीम थंडावली. करोनाकाळात अनेक सोसायट्यांना सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणीही मिळत नव्हते. त्यामुळे कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांची संख्या वाढू शकली नाही. आता महानगरपालिकेने पुन्हा सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button