breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दुसरी लाट अद्याप संपलेली नाही – आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने ओसरू लागली असून देशातील संसर्गाचा दर ५ टक्क्यांच्याही खाली आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सध्या देशातील १०० जिल्ह्यांत १०० हून अधिक रुग्ण आढळत असल्याचेही सांगण्यात आले. नव्या डेल्टा प्लस विषाणूचा ११ राज्यांत प्रसार झाल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

‘‘कोरोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संसर्ग झाला तरीसुद्धा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जवळपास नसते.’’ असे निरीक्षण नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी नोंदविले आहे. छत्तीसगडच्या एका संस्थेने केलेल्या संशोधनाचा हवाला देत त्यांनी सांगितले की, ‘‘ लशींचे दोन्ही डोस घेणाऱ्याचे संरक्षण करण्यास ही लस ९८ टक्के सक्षम असल्याचे आढळून आले आहे.’’ आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, की ‘‘ मागील आठवडाभरापासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. सक्रिय रुग्णसंख्या फक्त ५ लाख ९ हजार ६३७ इतकीच आहे. सध्या १० टक्क्यांहून जास्त सक्रिय रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांची संख्याही फक्त ७१ इतकीच राहिली आहे.’’

लसीकरणाला वेग

डेल्टा प्लस विषाणू आढळलेल्या राज्यांची संख्या १२ झाली आहे. याचा प्रसार अद्याप स्थानिक पातळीवरच मर्यादित असताना त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राज्यांना सूचना देण्यात आल्याचेही केंद्राने म्हटले आहे. सध्या १२ राज्यांत नव्या विषाणूचे ५६ रुग्ण आढळून आले आहेत, असेही अग्रवाल म्हणाले. दरम्यान लसीकरण मोहिमेनेही वेग पकडला असून अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त नागरिकांचे भारतात लसीकरण झाल्याची माहिती डॉ. पॉल यांनी दिली.

गर्भवती महिलांचेही लसीकरण

गर्भवती महिलांनाही लसीकरण करण्यास राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने मान्यता दिल्याचे पॉल यांनी सांगितले. देशातील ज्या राज्यांत रुग्णसंख्या वाढत आहे, तेथे पुन्हा आरोग्य पथके पाठविण्यात येत असल्याचेही पॉल यांनी सांगितले. कोरोना विषाणूविरोधातील वैश्विक युद्ध अजूनही सुरू आहे कारण अमेरिका, ब्रिटन, इस्राईल व रशियातही रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोव्हॅक्सिनचा डोस प्रभावी

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस कोरोना विषाणूच्या अल्फा व घातक अशा डेल्टा या दोन्ही विषाणूंपासून संरक्षण करण्यात विलक्षण प्रभावी ठरत असल्याचे अमेरिकेच्या संशोधन संस्थेने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संस्था याच महिन्यात कोव्हॅक्सिनवर मंजुरीची मोहोर उमटविण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) म्हटले आहे की,‘‘ कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले की कोरोनापासून प्रभावीरित्या संरक्षण होते.’’

सहा राज्यात वाढतोय कोरोना

देशभरात अनेक राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी होत असला, तरी काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आज केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, ओडिशा, छत्तीसगड आणि मणिपूर या राज्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उच्चस्तरिय पथके पाठवली आहेत. तिसऱ्या लाटेच्या पाश्‍वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोना व्यवस्थापनासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकार विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना भेट देण्यासाठी केंद्रीय पथके पाठवत असते. ही पथके राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तिथली आव्हाने आणि समस्या जाणून घेतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button