breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राम-लक्ष्मणाची जोडी अभेद्यच; पदवाटपात सर्वकाही पूर्वनियोजित!

  •  पिंपरी-चिंचवडमधील विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा पाय खोलात
  • दोघांच्या वादाचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात पक्ष संघटन विसरले
  • महापालिकेत लांडगे, जगताप आणि जुन्या गटाला समान न्याय

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपाची ‘राम-लक्ष्मण’ जोडी अभेद्य आहे. अगदी २०१७ पासून सत्ता मिळाल्यानंतर पदवाटपात दोघांनी पूर्वनियोजित रणनिती आखली आणि यशस्वीही केली आहे. याउलट, भाजपाच्या गट-तटाचा आणि अंतर्गत नाराजीचा फायदा मिळेल, अशा प्रतीक्षेत असलेल्या प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे मात्र पक्ष संघटन आणि पक्षाची ताकद वाढवण्याकडे दुर्लक्ष झाले. याचा फटका आगामी निवडणुकीत बसणार आहे.

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पार्टीने सत्ता काबिज केली. जुना गटातील कार्यकर्त्यांनी त्यांना खंबीर साथ दिली.
सत्ता स्थापनेनंतर महापालिकेतील अधिकार आणि पदवाटपाबाबत राज्यातील तत्कालीन पक्षश्रेष्ठी श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. रावसाहेब दानवे, श्री. गिरीष बापट आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांसमोर बैठक झाली. त्यावेळी शहरातील आमदार जगताप, आमदार लांडगे आणि तत्कालीन राज्यसभा खासदार अमर साबळे उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार स्थानिक पातळीवर पक्ष आणि पदवाटपाबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे राम-लक्ष्मण जोडीला देण्यात आले होते. त्यानुसारच गेल्या चार-साडेचार वर्षांत महापालिकेतील पदवाटप झाले आहेत. बाकी नाराजी किंवा वाद-विवाद हा केवळ ‘ड्रामा’ आहे.

… असा ठरला होता पदवाटपाचा फॉर्म्यूला…
पक्षश्रेष्ठींसोबत २०१७ मध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महापालिकेतील पदवाटपाचा ‘फॉर्म्यूला’ ठरला होता. सुरवातील अडीच वर्षे महापौरपद लांडगे गटाकडे, शेवटचे अडीच वर्षे महापौरपद जगताप गटाकडे आणि सत्तारुढ पक्षनेतेपद जुन्या गटाकडे देण्यात येईल. आता महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समिती सभापतीपदासाठी सुरूवातीची २ वर्षे जगताप गट, २ वर्षे लांडगे गट आणि १ वर्षे जुना गट असे सूत्र ठरवण्यात आले. त्यानुसारच पदवाटप झाल्याची वस्तुस्थिती आहे.

दोन्ही आमदारांनी संभाव्य नाराजीचा बंदोबस्त केला…

भाजपाचे दोन्ही आमदारांना पदवाटपात होणाऱ्या संभाव्य नाराजीचा अंदाज होता. पदवाटपामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्यास कोणी- कोणाची समजूत काढायची… याबाबत अप्रत्यक्ष ठराव दोन्ही आमदारांमध्ये झाला आहे. परिणामी, भोसरीतून सीमा सावळे, एकनाथ पवार, रवि लांडगे, शैला मोळक, विलास मडिगिरी तसेच चिंचवडमधून शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, शितल शिंदे, सचिन चिंचवडे, जयश्री गावडे, माया बारणे आणि पिंपरीतून आशा शेंडगे, संदीप वाघेरे, तुषार हिंगे, शैलेश मोरे आदी नगरसेवक त्या-त्यावेळी काहीतरी कारणाने नाराज असल्याबाबत चर्चा झाली. मात्र, दोन्ही आमदारांच्या अप्रत्यक्ष ठरावानुसार संबंधितांची नाराजी थोपवण्यात भाजपाला यश मिळाले. त्यामुळेच आजवर एकाही नगरसेवकाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे किंवा पक्षाविरोधात बंडखोरी केल्याचे दिसत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे काय चुकले?

भाजपाचे दोन्ही आमदार पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात ‘आउट गोईंग’ झाल्यामुळे महापालिकेतील सत्ता गेली, अशी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सुरवातीला केला. त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये केवळ भाजपाच्या दोन्ही आमदारांच्या वादाचा आणि नाराज नगरसेवकांचा फायदा राष्ट्रवादीला कसा होईल? याचे अंदाज बांधण्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी धन्यता मानली. अगदी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापती निवडणुकीतही भाजपामध्ये नाराज झालेल्यांना सोबत घेवून ‘सांगली पॅटर्न’ घडवण्याच्या वल्गना करण्यात आल्या. याउलट, राष्ट्रवादीतील शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, योगेश बहल यांसारख्या नेत्यांनी दुसऱ्याच्या लाकडांनी शेकोटी घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परिणामी, पक्षसंघटना वाढली नाही. २०१७ मध्ये पक्षाची जी स्थिती होती, तिच स्थिती पाच वर्षांनंतरही शहरात जैसे- थे आहे. याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button