TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

 महानगरपालिका एकाच प्रभागात ४५ बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी लॅपटॉप देणार

गेली पाच वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळणारे आणि महानगरपालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला गेलेल माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या प्रभाग क्रमांक २०९ मध्ये प्रशासनाने मेहरनजर केली आहे. ई विभाग कार्यालयाच्या हद्दीतील सातपैकी केवळ २०९ प्रभागातील गरीब, गरजू, अपंग महिला-पुरुष प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांना, तसेच संगणकीय ज्ञान असलेल्या व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी लॅपटॉपचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर त्यासाठी अर्जही वितरीत करण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत ई विभाग कार्यालयाच्या हद्दीतील माझगाव परिसरातील प्रभाग क्रमांक २०९ मधून विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार यशवंत जाधव यांची मातोश्रीने स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लढविली होती. त्यामुळे महानगरपालिकेत सत्तेवर आलेल्या शिवसेनेसमोर भाजपचे कडवे आव्हान होते. भाजपच्या नगरसेवकांनी पारदर्शकतेचे पाहारेकरी म्हणून सभागृहात बसणे पसंत केले. स्थायी समितीच्या बैठीकत येणाऱ्या विविध कामांच्या प्रस्तावावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली होती. गेल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत प्रभाग क्रमांक २०९ मध्ये कापडी पिशव्या, लॅपटॉप, घरगंटी, शिलाई यंत्र, प्लास्टिकच्या ताडपत्री, फूड ट्रक आदींचे वाटप करण्यात आले होते. एकाच प्रभागातील मतदारांवर खैरात करण्यात येत असल्यामुळे भाजपसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा याच प्रभागामध्ये लॅपटॉपचे वितरण करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.

या प्रभागात लॅपटॉपचे वितरण करण्याबाबतची जाहिरात वृत्तपत्रांमध्ये नुकतीच जाहीर करण्यात आली होती. लॅपटॉपसाठी इच्छुक असलेल्यांना लाभार्थी प्रभाग क्रमांक २०९ मधील असावा, त्याचे वय किमान १८ आणि कमाल ४५ वर्षे असावे, लाभार्थ्याचे नाव प्रभाग क्रमांक २०९ मधील निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये असावे, पिवळे / केशरी शिधावाटप कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र आवश्यक, लाभार्थी अपंग असल्यास ४० टक्के वा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि लॅपटॉप हाताळण्यासाठी सक्षम असणे, रोजगार विनियम विभागाकडे नोंद व प्रमाणपत्र, संगणकीय प्रमाणपत्र, शासकीय अथवा निमशासकीय खासगी क्षेत्रात काम करीत नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र, किमान १२ वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आदी अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

लॅपटॉप देण्यासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन ई विभागामार्फत करण्यात आले आहे. साधारण ४५ जणांना लॅपटॉप देण्यात येणार आहेत. त्यासाठी २८ सर्वसाधारण बेरोजगार, १५ महिला बेरोजगार आणि दोन अपंग अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button