breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

आईच्या हृदयाचा ‘लीजंड’ बाप गेला!; ताडोबातील जगप्रसिद्ध ‘वाघडोह’ वाघाचा मृत्यू

नागपूर/चंद्रपूर : बछडे जगतात काय की मरणाच्या तोंडात जातात काय, याची नर वाघाला फारशी काळजी नसते. ही सर्व जबादारी असते वाघिणीची. वाघिणीचा जीव पिल्लांत सतत गुंतलेला असतो. त्यांच्या सुरक्षेची ती मोठी होईपर्यंत काळजी वाहत असते. वाघ मात्र याबाबत बेफिकीर असतो. वाघडोह तसा नव्हता. हा बाप आईच्या हृदयाचा होता. पिलांची तो कसोशीने काळजी घ्यायचा. हे वाघांच्या स्वभावाविरुद्ध होते. पण वाघडोह अपवाद होता. कुटुंबवत्सल होता. आठवणींचा असा उजाळा दाटून येत होता. वाघडोहला अखेरचा निरोप देताना डोळे पाणावलेलेही होते.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सर्वात मोठा; किंबहुना देशातील सर्वात मोठा वाघ मानल्या जाणारा वाघडोह हा वाघ सोमवारी सिनाळा भागात मृतावस्थेत आढळला. वृद्धापकाळामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक निदान आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला शिकार करणे कठीण झाले होते. ताडोब्याच्या अधिकाऱ्यांचे त्याच्यावर लक्ष होते. चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये या वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. नमुने पुढील तपासणीसाठी नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

हा वाघ २०१०मध्ये ताडोबा परिसरात दिसला. त्यावेळी तो सुमारे साडेचार वर्षांचा होता. आला तेव्हापासून त्याने वर्चस्व प्रस्थापित केले. प्रसिद्ध वाघीण माधुरी ही त्याची पहिली जोडीदार होती. त्यांच्या बछड्यांनीही ताडोब्याच्या जंगलावर अधिराज्य गाजविले. पिल्लांची आई शिकारीसाठी गेली की वाघडोह पिलांची काळजी घ्यायचा. त्याच्यामुळे त्याची पिल्ले खूप जगली. ताडोब्याला प्रसिद्धी मिळवून देण्यात, ताडोब्याच्या विकासात या वाघाचा सिंहाचा वाटा होता.

…म्हणून तो ‘वाघडोह’

वाघडोह हा ताडोब्याच्या जंगलातील प्रसिद्ध पाणवठा आहे. याच पाणवठ्यावर हा वाघ पहिल्यांदा दिसला. तेव्हापासून ते ‘वाघडोह’ नावानेच ओळखला जाऊ लागला. वन्यप्रेमी आणि अभ्यासकांमध्ये तो ‘स्कारफेस’ म्हणून ओळखला जात होता. तो आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खुणा होत्या. ओठ फाटलेले होते. एक डोळा अर्धवट उघडलेला होता. युद्धातून जखमी पण विजयी वीर आल्याचा तो भाव होता. सुरुवातीचे काही महिने अतिशय बुजरा असायचा. जिप्सी आल्या की जंगलात पळायचा, पण नंतर मात्र निर्धास्त झाला. तो आक्रमक नव्हता. त्याच्यासारखा कुटुंबवत्सल वाघ आजपर्यंत पाहिला नाही, अशी माहिती प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक अतुल धामनकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button