ताज्या घडामोडीमुंबई

पाणीकपातीची टांगती तलवार कायम ; भातसा धरणातील बिघाडाची दुरुस्ती आणखी १५ दिवस

मुंबईकरांना मार्च महिन्यातच १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे

मुंबई | भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किमान पंधरा दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील १५ टक्के पाणी कपात अजून काही दिवस सुरू राहणार आहे. या कालावधीत मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. पाणी पोहोचत नसलेले उंच टेकडीवरील भाग किंवा जलवाहिनीच्या शेवटच्या टप्प्यातील भागांसाठी पाणी कपात शिथिल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात सध्या पुरेसा साठा आहे. पाणीकपात करण्याइतका साठा खालावलेला नाही. तरीही मुंबईकरांना मार्च महिन्यातच १५ टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. ही पाणीकपात २८ फेब्रुवारीपासून सुरू आहे. भातसा हे धरण राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मालकीचे असून भातसा धरणातील हा बिघाड नक्की किती मोठा आहे, तो दुरुस्त होण्यास किती वेळ लागेल याचा आढावा घेऊन सुरुवातीला पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र हा बिघाड दुरुस्त होण्यास आणखी पंधरा ते वीस दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या संबंधित विभागाने ही पंधरा दिवसांची मुदत तोंडी कळवली आहे. प्रत्यक्षात किती कालावधी लागेल हे स्पष्ट नसल्याचे समजते.

बिघाड दुरुस्त होण्यास वेळ लागणार असल्यामुळे मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाणीकपातीची झळ मुंबईकरांना बसू नये म्हणून वेगवेगळे पर्याय जल अभियंता विभाग तपासून पाहत आहे. त्यात पुरेसा पाणीपुरवठा व्हावा याकरिता वैतरणा धरणातून अधिक २०० दशलक्ष लिटर साठा मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे रोजच्या पाणीपुरवठय़ात थोडी थोडी वाढ होते आहे. तरीही टक्केवारीच्या स्वरूपात पाणीकपात कमी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे काही ठरावीक भागात पाणीकपात शिथिल करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जे भाग उंचावर आहेत किंवा जलवाहिनीच्या शेवटच्या टोकाला असतात त्यांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत असतो. त्यामुळे त्यांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सर्वाधिक पाणीपुरवठा भातसामधून

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे २००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा भातसा धरणातून होत असतो. सध्या या धरणातून १४०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या या धरणाच्या बांधकाम खर्चाचा काही अंशी वाटा मुंबई महापालिकेने उचलला होता. त्यामुळे कराराप्रमाणे मुंबईसाठी भातसा धरणातून ठरावीक मर्यादेत पाणी सोडले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button