TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

हॉटेल्ससह निवासी संकुले, शाळा, कार्यालयांमध्येही यंदा ‘हॅलोविन’चा उत्साह

मुंबई : भुतांचा सापळादर्शक गणवेश.. पिंजारलेले केस.. रंगविलेले तोंड.. हडळदर्शक दंतपंक्ती आणि ओंगळअवतारात होळीतील ‘आयना का बायना घेतल्याशिवाय जायना’ सारखा इंग्रजी अवतार म्हणजेच ‘ट्रीक ऑर ट्रीट’ हा उच्चारघोष.. असा ‘हॅलोविन’ माहोल गेले आठवडाभर मुंबई आणि उपनगरांतील हॉटेल्स, निवासी संकुले, शाळा आणि चक्क कार्यालयांमध्ये यंदा पाहायला मिळाला.

युरोप, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘हॅलोविन’साठी मुंबईतून देखील वर्षोगणिक प्रतिसाद वाढत चालला आहे. दोन वर्षांतील निर्बंधांमुळे विरस झालेल्या उत्सवप्रेमींनी यंदा या उत्सवाचीही मौज अनुभवली. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान अनेक ठिकाणी यानिमित्त खास सोहळय़ांचे आयोजन करण्यात आले.

आणि ते प्रचंड यशस्वीही झाले.  खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये दिवाळी समारंभांचा उत्साह ओसरतो तोच ‘हॅलोविन’चा रंग चढला. पाश्चात्य देशातील चित्रपट सृष्टीमधून आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही वर्षांपासून या सोहळय़ाची ओळख करून दिली जात आहे. त्यामुळे नाताळ, व्हेलेंटाईन डे, नव वर्ष यांच्या पंगतीत ‘हॅलोविन’देखील विराजमान होत आहे. ऑनलाइन बाजारपेठेत यासाठीचे पोषाख, साहित्य सहजी उपलब्ध होत असल्यामुळेही या परंपरेसाठीचा प्रतिसाद वाढल्याचे निरक्षण काही हॉटेलच्या व्यवस्थापकांनी नोंदवले.  

काय झाले?

मुंबईतील बहुतेक पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मोठ-मोठे मॉल्स, कॅफे, खासगी कंपन्यांची कार्यालये आदी ठिकाणी यंदा ‘हॉलोविन’ची भुताळ गंमत-जत्रा पाहायला मिळाली. कित्येक संकुलांमध्ये भयकारी गणवेशातील मुला-मुलींनी घरोघरी जात चॉकलेट- खाऊची बेगमी केली. अनेक आंतरराष्ट्रीय शाळांमध्येही हॅलोविन सोहळे रंगले. शिक्षक, विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळय़ा वेशभूषेत सहभागी झाले होते.

वेगळे काय?

अलीकडच्या काळात भारतात आणि प्रामुख्याने मुंबई मध्ये ‘हॅलोविन’ साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. चार-पाच वर्षांत तुरळक असलेले हे प्रमाण यंदा खूपच वाढल्याचे दिसले. चित्रपट-मालिका, इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि पुस्तके यांतून ‘हॅलोविन’चा परिचय यंदा पहिल्यांदाच प्रचंड सोहळय़ांमध्ये रुपांतर होण्याइतपत प्रभावी ठरला. 

नवी बाजारपेठ..

मुंबईतील नरिमन पॉईंट, वांद्र, अंधेरी, जुहू, सांताक्रूझ, लोखंडवाला, खार, वरळी, पवई या भागात ‘हॅलोविन पार्टी‘चे प्रमाण अधिक होते. यासाठी भुताचे मुखवटे, भयावह दिसणारे कोरलेले भोपळे, भोपळय़ाचे दिवे, टोप्या, भोपळय़ाच्या चॉकलेट्स, मेकअप साहित्य, यासाठी येथील बाजारात मोठी मागणी होती.

आर्थिक उलाढाल..

सशुल्क प्रवेश हॅलोवीन सोहळय़ांसाठी प्रवेश शुल्क २०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येत होते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. एका बडय़ा हॉटेलने आयोजित केलेल्या सोहळय़ासाठी पाच हजार रुपये प्रवेशशुल्क आकारले होते. त्यासाठी ७०० लोकांची उपस्थिती होती.

हॉटेल्ससाठी..

एका हॉटेलने साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करून ‘हॅलोविन’ सोहळय़ातून कितीतरी पटींची कमाई केली. मुंबईतल्या अशा अनेक हॉटेल्स, मॉल्स यांचा हॅलोवीन सोहळय़ांसाठीचा खर्चाचा आकडा लाखोंच्या पार गेला. फायद्यामुळे त्यांच्याही फायद्यांच्या सोहळेयादीत हॅलोविन सन्मानाने दाखल झाले. या परंपरेचे वाढते आकर्षण पाहून अनेक कॅफेजनी यंदा पहिल्यांदाच हॅलोविन पार्टी, सजावट, अनुषंगाने खाद्य पदार्थ सादर करण्याच्या पद्धती, पदार्थाचे नावे यातही प्रासंगिक बदल केले.

पार्टी आणि पोशाख.. 

मुंबईतल्या हॉटेल्स केफेस, मॉल्समध्ये ‘हॅलोवि’साठी वेगवेगळय़ा ‘थीम पार्टीज’ करण्यात आल्या. पवईमधील एका हॉटेलमध्ये बालकेंद्री ‘हॅलोविन’ अशी संकल्पना ठेवण्यात आली होती. त्यासाठी शेकडो मुलांची पालकांसह उपस्थिती होती. त्यात गमतीशीर खेळ, जादूचे प्रयोग अशा वेगवेगळय़ा कार्यक्रमांचा समावेश होता. एका हॉटेलने पाळीव प्राण्यांसाठीही ‘हॅलोविन’ आयोजित केले होते. या उत्सवासाठी वेगवेगळय़ा संकल्पना साकारण्यासाठी पाळीव प्राण्यांसाठीच्या पोषाखांची ऑनलाइन बाजारपेठेत रेलचेल होती.

हॅलोवीन म्हणजे काय?

दोन हजार वर्षांपूर्वी पोप बोनिफेस चौथा यांनी ख्रिस्ती शहीदांच्या स्मरणार्थ ‘ऑल सेंट्स डे’ सुरु केला.  सोळाव्या शतकात या प्रथेला पहिल्यांदा ‘हॅलोविन’ हे नावं देण्यात आले. हा दिवस पाश्चात्य देशात ३१ ऑक्टोबर रोजी पाळला जातो.

थोडी माहिती.. या दिवशी लहान मूले भुतासारखा चित्र – विचित्र वेशभूषा करून घरोघरी जातात. घराबाहेर भोपळय़ाला विचित्र आकारात कोरून त्यात मेणबत्ती लावतात त्याला ‘जॅक ओ लॅटर्न’ असे म्हणतात.  अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, द कोरिया, चीन, मेक्सिको, जपान, जर्मनी, अशा विविध देशांमध्ये हॅलोवीन साजरा केला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button