TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

धनुष्यबाण चिन्ह इतिहासजमा होणार

एकनाथ शिंदेंनी गिरवला इंदिरा गांधींचा कित्ता!

मुंबई । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा कितीही दावा करत असले तरी तशी शक्यता धूसर दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना हे चिन्ह सध्या गोठवले आहे. तसेच शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही वेगवेगळ्या नावासह पक्ष आणि चिन्हसुद्धा बहाल केलं आहे. तरीसुद्धा ठाकरे गट आणि शिंदे गट यांना भविष्यात धनुष्यबाण चिन्ह मिळण्याची आशा आहे. परंतु इतिहास काही तरी वेगळं सांगतो आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले. एवढेच नाही तर शिवसेना हे नाव जसेच्या तसे वापरण्यास बंदी घातली. तसेच हा निर्णय शेवटचा असल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणावरूनच १९६९ च्या काँग्रेसमधील पहिल्या फुटीच्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्यात. १९६९ मध्येही काँग्रेसमध्ये एकनाथ शिंदेंच्या उठावासारखीच स्थिती निर्माण झाली होती. इंदिरा गांधी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या होत्या आणि काँग्रेस सत्तारूढ असल्याने त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी निजलिंगाप्पा काँग्रेसचे अध्यक्ष होते. राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या संजीव रेड्डींचे नाव जाहीर झाल्यावर इंदिरा गांधींनी ऐन वेळी व्ही. व्ही. गिरी या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आणि गिरी हे संजीव रेड्डींचा पराभव करून राष्ट्रपतीपदी निवडून आले.

निजलिंगप्पांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने इंदिरा गांधींची पक्षातून हकालपट्टी केली. पण इंदिरा गांधींनी नवीन पक्ष स्थापन न करता आपणच खरी काँग्रेस असल्याचा दावा केला. तेव्हा काँग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी होते. हा वाद निवडणूक आयोगासमोर गेला. इंदिरा गांधींकडे संसदीय पक्षात बहुमत होते, तर निजलिंगप्पांकडे पक्षाच्या कार्यकारिणीत बहुमत होते. निवडणूक आयोगाने तेव्हासुद्धा काँग्रेसचे बैलजोडी हे चिन्ह गोठवले होते आणि दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह घेण्यास सांगितले. इंदिरा गांधींच्या पक्षाने काँग्रेस (न्यू ) हे नाव घेतले आणि त्यांना गाय-वासरू हे चिन्ह मिळाले. निजलिंगप्पाच्या काँग्रेसने काँग्रेस(ओल्ड) हे नाव धारण केले आणि त्यांना चरखा हे चिन्ह मिळाले.

निवडणूक आयोगाने त्यावेळीसुद्धा खरी काँग्रेस कुठली यावर निर्णय दिला नव्हता. बैलजोडी हे काँग्रेसचे मूळ चिन्ह परत कधी काँग्रेसच्या कुठल्याही गटाला मिळाले नाही. त्यावेळी पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात नसल्याने न्यायालयीन लढाया झाल्या नाहीत. कालांतराने सर्वच काँग्रेसजनांनी इंदिरा गांधींचे नेतृत्व मान्य केल्याने काँग्रेस(न्यू) हीच खरी काँग्रेस म्हणून ओळखली जाऊ लागली. निजलिंगप्पांचा काँग्रेस(ओल्ड) पक्ष काही काळानंतर दुर्बल होत गेला आणि आणीबाणीनंतर जनता पक्षात विलीन झाल्यावर हा पक्ष संपुष्टात आला.

१९७७-७८ मध्ये परत काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी आणि ब्रह्मानंद रेड्डी असे दोन गट तयार झाले. काँग्रेसचे नामकरण काँग्रेस (इंदिरा) आणि काँग्रेस (रेड्डी) असे झाले. यावेळीसुद्धा नवीन चिन्हे देण्यात आली. काँग्रेस(इंदिरा) या पक्षाला हाताचा पंजा हे चिन्ह मिळाले. थोड्याच काळानंतर रेड्डी काँग्रेसचे विलीनीकरण काँग्रेस(आय) मध्ये होऊन एकसंघ काँग्रेस अस्तित्वात आली आणि हाताचा पंजा हे सध्या प्रचलित असलेले चिन्हच काँग्रेसची निशाणी ठरली. या पूर्वोतिहासाप्रमाणे आता शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह यापुढे कोणत्याही गटाला मिळणार नाही हे अद्याप अस्पष्ट असले तरी शेवटी जे नेतृत्व पक्षात सर्वमान्य ठरेल त्याच नेत्याचा पक्ष भविष्यात शिवसेना म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह भविष्यात कोणाला मिळणार हे लवकरच समजणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button