महापालिकेच्या चिखलीतील शाळेत ९ वी, १० वीच्या वर्गांची घंटा अखेर वाजली !
माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी । प्रतिनिधी
चिखली आणि परिसरातील विद्यार्थ्यांना महापालिका शाळेतच ९ वी व १०वीचे शिक्षण मिळावे. यासाठी महापालिका शिक्षण विभागाकडे मागणी करण्यात आली. त्याला यश मिळाले असून, शाळेचे वर्ग सुरू झाले आहेत, अशी माहिती भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायवाड यांनी दिली.
मनपा शाळा क्रं ९०-९१ मध्ये फक्त इ. ८ वीपर्यंत शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे इ. ९ वी व इ.१० वीच्या विद्यार्थांना शिक्षणासाठी बाहेरील शाळेमध्ये जावे लागत होते. परिणामी, पालकांना आर्थिक झळ सोसावी लागत होती. त्यामुळे या शाळांमध्ये ९वी व १० वीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी पालकांनी केली होती.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू णाल्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी उपस्थित तत्कालीन नगरसेविका साधना मळेकर, स्विकृत नगरसेवक संतोष मोरे, अंकुश मळेकर व मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
याबाबत भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी पुढाकार घेत महापालिका शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता ९ वी व १० वीसाठी विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता राहणार नाही. याच शाळेत विद्यार्थी १० वी पर्यंत शिक्षण घेवू शकतात.
याबाबत माजी नगरसेवक कुंदन गायकवाड म्हणाले की, मनपा शाळेमध्ये इ. ९ वी व इ.१० वी चे नवीन वर्ग सुरु करावे, अशी मागणी केली होती. तसेच, पालक आणि विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय आणि आर्थिक नुकसान याबाबत लक्ष वेधले होते. त्यावर सहायक आयुक्त संदीप खोत यांनी सकारात्मक निर्णय घेत कार्यवाही केली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.