‘मराठा आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाच नाही’; ठाकरे गटातील नेत्याची टीका

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, मराठा, ओबीसींसह अन्य समाजांचीही भाजपा दिशाभूल करीत आहे. कुणालाही आरक्षण द्यायचे असल्यास संविधानातील मर्यादेची अट शिथिल करावी लागेल. त्यामुळे राज्य सरकारला हे आरक्षण देता येते का? हा विचार आधी केला पाहिजे. केंद्रात भाजपाचे पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. तरीही भाजपा ठोस पाऊले उचलत नाही.
हेही वाचा – भारतीय संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
सरकारचे वेळकाढू धोरण असून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावनांसोबत भाजपा खेळत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. आरक्षणाचे समर्थक आणि विरोधक राज्यातील सत्तेत सहभागी आहेत. काही जण मराठा आरक्षणाला समर्थन असल्याचा देखावा करीत असले तरी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना त्यांचा छुपा पाठिंबा आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
अकोला शहरात अल्पवयीन मुलीवर अमानवीय पद्धतीने झालेल्या अत्याचार प्रकरणात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले. राज्यात सातत्याने दंगली होत असून महिलांवरील अत्याचार वाढले आहे. अंमली पदार्थांचा सर्रास व्यवसाय होत आहे, असा आरोप अंधारे यांनी केला.