breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘याअगोदर काय घडले हे विसरुन उद्याचा उष:काल येण्यासाठी काम करुया’; सुनिल तटकरे

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील व गौरवशाली भारताची वाटचाल सुरू राहिल; पेण येथे महायुतीची जाहीर सभा पार

पेण | आज राजकारणात अनेक स्थित्यंतरे घडल्यानंतर महायुती ही भक्कमपणे उभी राहिली आहे. आता माझ्या प्रचाराची धुरा महायुतीच्या सर्व नेत्यांनी खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे याअगोदर काय घडले हे विसरुन जा आणि उद्याचा उष:काल येण्यासाठी काम करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी पेण येथे केले.

मुंबईमध्ये पक्षाचा जाहीरनामा दुपारी एमसीए लॉन्ज येथे प्रसिद्ध केल्यानंतर खासदार सुनिल तटकरे यांची पेण शहरातील आगरी समाज सभागृहात जाहीर सभा पार पडली. रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला असून त्यामध्ये पेण मतदारसंघात महायुतीची सर्वाधिक एकत्रित ताकद आहे. जवळ जवळ ८५ ते ९० टक्के मतदान महायुतीचे आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला ‘घड्याळ’ या चिन्हावर मतदान करायचे आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

पुढील पाच वर्षे महायुती बळकट आणि मजबूत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासकामांसाठी माझी साथ मिळेल असा शब्द सुनिल तटकरे यांनी यावेळी दिला. वैचारिक लढा आपण लढत आलो आहोत पण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशी आपली जुळवणूक कधी बघायला मिळाली नाही. मात्र महायुतीच्या माध्यमातून ती भक्कमपणे बघायला मिळत आहे.

हेही वाचा    –    अजितदादांनाच ‘राष्ट्रवादी’ पक्षातून काढून टाकू शकतो; ‘या’ नेत्याने दिला इशारा

एकहाती सत्ता कुणाला कधी मिळाली नाही. मात्र देशात नेहरू-गांधी परिवारानंतर एकहाती सत्ता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशात अनुभवायला मिळत आहे. आज एकहाती सत्तेमुळे विकसित राष्ट्रांमध्ये आपला पहिल्या सातमध्ये नंबर आहे याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले.

या देशाची घटना बदलली जाईल असे काहीजण सांगत आहे…निवडणूका आल्यावर तुम्हाला संविधानाची आठवण व्हायला लागली आहे. वा रे वा…अशी मिश्किल टिप्पणी करत कॉंग्रेसची सत्ता असताना घटनेतील काही कलमांमध्ये बदल करण्यात आले याची आठवण सुनिल तटकरे यांनी करून दिली. एनडीएचे सरकार येईल आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील व गौरवशाली भारताची वाटचाल सुरू राहिल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

अनंत गीते नशीबवान आहेत त्यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करायला मिळाले… पण आज हेच अनंत गीते मोदींवर टिका करत आहेत.. भाजपने सहकार्य केले नसते तर अनंत गीते पुन्हा दिसले नसते असा जोरदार टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.
एका विचाराने सोबत राहुया. पुढच्या निवडणुकीत एकत्रित येऊन विरोधकांना तडीपार करुया असे आवाहन माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील यांनी यावेळी केले.

पेण येथील या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशील पाटील,आरपीआयचे एम. डी. कांबळे आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button