breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

लढाईसाठी नको, जिंकण्यासाठी निवडणूक मैदानात उतरा – रवींद्र मिर्लेकर

 भोसरी –आगामी महापालिका निवडणुकीत भगवा फडकविण्याच्या इराद्याने शिवसैनिकांनी तयारीला लागावे. सभासद नोंदणी, मतदारनोंदणी इर्षेने करावी. अधिकाधिक माणसे, कुटुंब शिवसेनेशी जोडावीत. अहंकाराला मूठमाती देऊन सर्वसामान्यांचा आधारवड व्हावे, लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, असा कानमंत्र शिवसेना उपनेते, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी दिला. आता लढाईसाठी नव्हे तर जिंकण्यासाठीच मैदानात उतरा, असेही ते म्हणाले.

‘शिवसेना मिशन-२०२२’ अंतर्गत शनिवारी (दि. ३०) भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा मेळावा शाहूनगर येथे पार पडला. त्यावेळी मिर्लेकर बोलत होते. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळा कदम, शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख माउली कटके, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.

वाचा :-रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

मिर्लेकर म्हणाले, “शिवसेनेचा जन्म आंदोलनातून झाला आहे. संघर्ष हा शिवसेनेचा स्थायीभाव आहे. तर, चळवळ ही शिवसैनिकांची मूळ ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसैनिकांनी अनेक चमत्कार घडविले आहेत. शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख आणि युवा सेनाप्रमुख हाच आपला गट असून, त्यांच्याशीच आपली बांधिलकी आहे. अनेक शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसेनेचा वटवृक्ष बहरला आहे. आंदोलने. मोर्चे यात शिवसैनिक नेहमीच आघाडीवर असतो.

मात्र, निवडणुकांच्यावेळी आपण पिछाडीवर जातो. मात्र आता सर्वसामान्य शिवसैनिकही नगरसेवक म्हणून महापालिका सभागृहात गेला पाहिजे. वर्षभराचा ‘टाईमबाऊंड प्रोग्राम’ तयार केला पाहिजे. सक्षम यंत्रणा तयार करून कठोर मेहनत केली पाहिजे. निवडणुकीच्या मैदानातही आपण विजयश्री खेचून आणली पाहिजे, त्यासाठी सज्ज व्हा.’

आढळराव-पाटील म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. जिथे लोकप्रतिनिधी पोहचू शकत नव्हते तिथे शिवसैनिक पोहोचला. सामाजिक कार्यात आपण नेहमीच अग्रेसर असतो. मात्र, निवडणुकीच्या वेळीच आपण गाफील राहतो. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघात आपल्याला अपयश आले. तरी उमेद न हारता जिद्दीने, ताकदीने पुन्हा सक्रिय राहिले, आपली नाळ लोकांपासून तोडली नाही. आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरू झाले आहे. भोसरीत आपली लढाई भाजपबरोबर आहे. त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपली यंत्रणा तयार ठेवा. गटबाजी विसरून नव्या उमेदीने निवडणूक कामाला लागा’, असे आवाहन त्यांनी केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button