TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखून समाजकार्याची भावना बाळगावी – आयुक्त शेखर सिंह

विद्यार्थ्यांशी संवाद : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आयुक्तांची समर्पक उत्तरे

पिंपरी : समाजात विद्यार्थी हे जास्त प्रमाणात जागरूक असतात. त्यांनी आपली क्षमता ओळखून समाज कार्याची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपले कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाज घटकांशी संवाद साधला जातो. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील भारताचे नागरिक आहेत. त्यांच्या मनातील विविध विचार, प्रश्न जाणून घेणे हे शहराच्या विकासाचे नियोजन करताना महत्त्वाचे ठरते. त्या अनुषंगाने दि. ११ जुलै रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचा शहरातील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे उपायुक्त रविकिरण घोडके, ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य मनोज देवळेकर, पर्यवेक्षक सुधीर कुलकर्णी, पर्यवेक्षिका कल्याणी पटवर्धन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उषा मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मा. आयुक्तांशी थेट संवाद साधला. त्यांना विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांना मा. आयुक्तांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली. शहराचा विकास, त्यासंदर्भात आपली भूमिका इत्यादी विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच मा. आयुक्तांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनदेखील मिळाले. यावेळी विद्यार्थ्यांनी खालील प्रश्न विचारले.

१. विद्यार्थी समाजासाठी कशा प्रकारे योगदान देऊ शकतो?

या प्रश्नाच्या उत्तराला अनेक पैलू आहेत. विद्यार्थ्यांना आपले पालक, आपल्या शेजारी राहणारे नागरिक यांना पर्यावरणाविषयी जागरूक करता येऊ शकते. सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर बंद करणे, रूममध्ये कुणी नसल्यास लाईट बंद करणे अशा छोट्या छोट्या कृतींमधून आपण पर्यावरणाविषयी जागृती करू शकतो. तसेच विद्यार्थ्यांनी स्वत:च्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. ज्या क्षेत्रामध्ये रस आहे त्यामध्ये झोकून देऊन काम केले पाहिजे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात मनापासून काम करून देशासाठी संपूर्ण योगदान देऊ शकतो.

२. बांधकामांकरिता नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर आपण पर्यावरणाचा समतोल कसा साधू शकतो?

पूर्वीपासूनच संपूर्ण देशातून शहरांमध्ये लोकांचे स्थलांतर होत आहे. शहरांमध्ये असलेल्या आर्थिक विकासाच्या संधींमुळे नागरिक शहरामध्ये येतात. गेल्या काही वर्षांत पिंपरी चिंचवडची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये शहराचा विस्तार झाला. तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करण्यात आला. नव्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे स्रोत तयार करणे आणि आहे त्या जमिनीची उत्पादकता वाढवणे हे त्या वरील उपाय आहेत. पर्यावरणपूरक विकास करणे ही काळाची गरज आहे.

३. गरिबी हा आपल्यासमोरील एक गंभीर प्रश्न आहे. यावर आपले मत काय?

इतिहास पाहिला असता भारत हा एक समृद्ध देश होता हे दिसून येते. परकीय आक्रमणामुळे भारताची आर्थिक प्रगती मंदावली. गरिबी निर्मुलनासाठी शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना, रेशन योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. शिक्षणाच्या माध्यमातून एखाद्या परिवाराला दारिद्र्यातून बाहेर काढता येणे शक्य आहे. त्यासाठी कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मिती हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहाय्य देण्यात येत आहे. महापलिकेच्या वतीने स्वनिधी योजनेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना आर्थिक मदत देण्यात येते.

४. तुम्ही तुमचे काम करण्यासाठी सीमावर्ती प्रदेशातील जम्मू काश्मीर, मणिपूर राज्य केडर का निवडले नाही?

आपली आवड आणि ध्येय यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. त्यानुसार मी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांचे प्राधान्यक्रम भरले होते. महाराष्ट्रामध्ये मी गडचिरोली जिल्ह्यात काम केले आहे. प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारे काम करण्यासाठी संधी असलेले प्रदेश असतात.

५. हिंसेचे प्रमाण वाढले आहे. ते का वाढत आहे आणि त्याचे प्रमाण कसे कमी करण्यात येईल?

आपण आपल्या परंपरा, संस्कारांपासून दूर जात आहोत. आपली जीवनशैली केवळ पैसा केंद्रित झाली आहे. आपली गल्ली आणि सोसायटीमधील शेजाऱ्यांमध्ये कौटुंबिक संबंध कमी होत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण मोठे आहे. याला उपाय म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून नव्या पिढीला घडवणे. प्रत्येकामध्ये माणुसकीची भावना जागृत करून आपण हिंसाचाराचे प्रमाण कमी करू शकतो.

या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना मा. आयुक्तांनी अनेक मुद्दे सांगितले. असुरक्षित पद्धतीने खाद्यपदार्थ बनवणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत होर्डिंग आणि फ्लेक्सविरोधात देखील कारवाई करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. जून २०२४ पर्यंत स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. संवाद विद्यार्थ्यांशी या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button