breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

‘तुफान’ पुन्हा येतंय : माजी आमदार  विलास लांडे ‘शहराध्यक्ष’?

भाजपा+अजित पवार गटाला आव्हान : जबाबदारी घेण्याबाबत शरद पवारांचाही आग्रह

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ‘चाणक्य’ माजी आमदार विलास लांडे यांचे दमदार पुनरागमन होणार आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शहराध्यक्षपदाची जबाबदारी लांडे यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी ‘शब्द’ टाकला आहे, अशी महिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील मातब्बर नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यासह राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरही दावा केला आहे. पक्षात मोठी बंडखोरी झाल्यानंतर तात्काळ शरद पवार यांनी संघटना पुन्हा उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने राज्यव्यापी दौरा सुरू केला. त्याची सुरूवात बंडखोर नेते छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यातून करण्यात आला. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विचार केला असता पुण्यातील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अजित पवार गटाकडून दीपक मानकर यांना शहराध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. याउलट,  पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाने यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शरद पवार गटाचा नवीन शहराध्यक्ष कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. 

दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवार की शरद पवार यापैकी कौण? याबाबत जाहीरपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पण, दोन दिवसांपूर्वी लांडे आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील बडा नेत्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी काही मोजके सहकारी त्यांच्या सोबत होते. याबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली असून, शरद पवार यांचे निष्ठावंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत विलास लांडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी घेणार आहेत. 

तसेच, आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जागावाटपाचे सर्वाधिकार देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, शिरुर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना राज्य निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असून, या जागेवर विलास लांडे यांना लोकसभा उमेदवारी देण्यात येईल. त्यासाठी लांडे इच्छुक आहेत, असेही सूत्रांकडून समजले आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी याबाबत अधिकृत भूमिका मांडलेली नाही. 

विलास लांडे यांचा संघर्ष काय सांगतो?

माजी आमदार विलास लांडे यांनी १९९२ मध्ये तत्कालीन शहराचे कारभारी अजित पवार यांच्यामनाविरुध अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर १९९३ व २००० मध्ये शहराचे महापौर झाले. त्यावेळीसुद्धा विलास लांडे अपक्ष निवडून आले होते. २००४ मध्ये हवेली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे यांना तत्कालीन शिवसेनेचे दिग्गज नेते स्व. गजानन बाबर यांच्याविरोधात उभे करण्यात आले. अत्यंत आव्‍हानात्मक असलेल्या निवडणुकीत लांडे यांना ‘रिस्क’ घ्यावी लागली होती. कारण, या निवडणुकीत स्व. लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी नाकारली होती. मात्र, अजित पवार यांच्या सूचनेनुसार, विलास लांडे यांना ‘रिस्क’ घ्यावी लागली. पण, लांडे यांनी गावकी-भावकी एक केली आणि या निवडणुकीत विजय मिळवला होता. असे असतानाही २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून लांडे यांना भोसरी विधानसभेत तिकीट मिळाले नाही. त्यांना अपक्ष लढावे लागले. त्यावेळीसुद्‍घा त्यांनी अपक्ष विजय मिळवला होता. २०१४ च्या निवडणुकीत भोसरीच्या राजकारणात महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीतील मोठ्या गटाने महेश लांडगे यांना साथ दिली. अजित पवार यांच्या सूचनेशिवाय पानही न हालण्याच्या काळात लांडगे यांचे ‘‘प्रचंड मोदी लाटेत’’ अपक्ष निवडून येणे हा चमत्कार सहज घडलेला नाही. अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडमधील राजकीय ‘एन्ट्री’नंतर प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष विलास लांडे यांना अजित पवार यांचा ‘पर्याय’ म्हणूनच टिकून रहावे लागले. किंबहुना, २०१९ मध्ये पक्षातील दुफळी रोखून राष्ट्रवादीची उमेदवारी विलास लांडे यांना मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. इंदापूर येथील भर सभेत अजित पवारांनी ‘‘तू काय करायचे ते कर…’’ अशी भूमिका मांडली. त्यामुळे लांडे पुन्हा अपक्ष रिंगणात उतरले. या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्त्वात लांडे यांची क्षमता असतानाही ‘लीडरशीप’ मिळालेली नाही किंवा शहराचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

महाविकास आघाडीचा लोकव्यापी चेहरा म्हणून माजी आमदार विलास लांडे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास भाजपा आणि अजित पवार गटाला तगडे आव्हान निर्माण होणार आहे. कारण, अजित पवार यांचा पर्यायी नेता म्हणून लांडे यांचा आजवरचा संघर्ष आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. 

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा नवा चेहरा…

राज्यातील आणि शहरातील बदलल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेवून चिंचवडमधून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या एका नेत्याने महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. कारण, भाजपा+शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशी महायुती झाली असून, चिंचवडमधून विद्यमान आमदार अश्विनी जगताप, विशेष निमंत्रीत सदस्य शंकर जगताप, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे अजित पवार गटाचे नाना काटे, भाऊसाहेब भोईर अशी इच्छुकांची भाऊगर्दी होणार आहे. याउलट, महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे भाजपाविरोधी जनमत आणि महाविकास आघाडीच्या ताकदीच्या जोरावर चिंचवडमध्ये निवडणूक सोपी होईल. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारी ‘क्लेम’ करीत एक बडा नेता विलास लांडे यांच्यासोबत शरद पवार यांना भेटला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button