Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

तंजावरचे मराठे राजे सरफोजींचे चोरीला गेलेले चित्र अमेरिकेत सापडले

चेन्नईः तंजावरचे राजे शरफोजी दुसरे आणि त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांचे १९व्या शतकातील चित्र अमेरिकेतील संग्रहालयात आढळले आहे. सरस्वती महल येथून चोरीला गेलेले हे चित्र २००६मध्ये अमेरिकेतील संग्रहालयात पोहोचल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक के. जयंत मुरली यांनी शुक्रवारी दिली.

तंजावरच्या भोसले राजघराण्यातील सरफोजी हे शेवटचे राजे होते. १८३२मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांनी १८५५पर्यंत राज्य केले. पुढे तंजावरचे ब्रिटिश प्रांतात विलीनीकरण झाले. राजे सरफोजी यांचे हे चित्र १८२२ ते १८२७ या काळात काढण्यात आले असावे, असे काही इतिहासतज्ज्ञ सांगतात. लोकांसाठी १९१८मध्ये खुल्या करण्यात आलेल्या सरस्वती महल ग्रंथालयात हे चित्र ठेवण्यात आले होते.

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समधील पेबडी एसेक्स म्युझियमने (पीईएम) २००६मध्ये चित्रांचा व्यापारी सुभाष कपूर याच्याकडून ३५ हजार डॉलरला २००६मध्ये हे चित्र विकत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या संग्रहालयाने सुभाष कपूरकडून अनेक दुर्मीळ वस्तू विकत घेतल्या आहेत. भारतातील दुर्मीळ वस्तू चोरल्याप्रकरणी कपूर याला २०११मध्ये फ्रँकफर्ट विमानतळावर अटक करण्यात आली होती.

भारतीय कलावस्तूंचा संग्राहक लिओ फिगिल याचे नाव कपूरने वापरले होते. फिगिल याचा २०१३मध्ये मृत्यू झाला आहे. कपूरने फिगिल यांचे बनावट पत्र दिले होते आणि त्यामध्ये संबंधित चित्र १९६९च्या युरोपीय संग्रहातील असल्याचा दावा केला होता, असे पोलिसांनी सांगितले. सरफोजी यांचे चित्र चोरून आणलेले असल्याचे समजल्यानंतर ‘पीईएम’ या संग्रहालयाने ते अमेरिकेतील गृह विभागाला दिले आहे.

दरम्यान, अमेरिकेने २०१५मध्ये हे चित्र भारताला देण्याची तयारी दाखवली. मात्र, त्यानंतरही हे चित्र तमिळनाडूत परत आणण्यासाठी पावले उचलण्यात आली नाहीत,’ असा दावा मुरली यांनी केला आहे. तमिळनाडू पोलिसांचा मूर्ती विभाग सरफोजींचे चित्र सरस्वती महालात परत आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे चित्र चोरीला गेल्याची तक्रार २०१७मध्ये पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button