breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; केंद्रावर अवलंबून राहणार नाही!

मुंबई – ज्येष्ठ नागरिक, अंथरुणाला खिळलेल्या आणि आजारी नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी महाराष्ट्रात लवकरच घरोघरी लसीकरणास सुरुवात करणार असल्याची माहिती ठाकरे सरकारने न्यायालयात दिली. तसेच घरोघरी लसीकरणास पुण्यापासून प्रायोगित तत्त्वावर सुरुवात करण्यात येईल, असे सरकारने सांगितले. त्याचबरोबर केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही, असेही राज्य सरकारने यावेळी म्हटले.

दरम्यान, घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारचा पाचकलमी कार्यक्रम तयार असताना केंद्र सरकराच्या मंजुरीची गरज काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला होता. तसेच केरळ, बिहार, झारखंडने परवानगी घेतली होती का? अशी विचारणा करून अंतिम टप्प्यात माघार घेण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. तर बुधवारी नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात आपण केंद्राच्या परवानगीची वाट पाहणार नसल्याचे सांगितले असून केंद्राच्या परवानगीशिवाय घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात करणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

राज्य सरकार घरोघरी लसीकरण प्रायोगित तत्त्वावर करणार असून याची सुरुवात पुणे जिल्ह्यातून करणार आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोहीम राबवली होती त्याच अनुभवाचा फायदा घेत ही मोहीम राबवली जाईल असे राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच पुण्याची निवड करण्याचे कारण सांगताना राज्य सरकारने यावेळी विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेला जुना अनुभव आणि जिल्ह्याचा आकार हे दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतल्याचे म्हटले. पुणे जिल्हा ना मोठा आहे, ना छोटा त्यामुळे ही निवड केल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

महत्त्वाचे म्हणजे घरोघरी लसीकरण मोहीम कशी राबवणार, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यासंदर्भात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता सुनावणी घेणार आहेत. यावेळी टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक आणि याचिकाकर्ते उपस्थित असतील. तसेच ज्यांना लस हवी आहे त्यांच्या कुटुंबीयांना ई-मेलच्या माध्यमातून नोंदणी करता येणार असून राज्य सरकार हा ई-मेल आयडी लवकरच प्रसिद्ध करणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button