Virat Kohli Retirement | विराट कोहलीने घेतला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

Virat Kohli Retirement | भारतीय क्रिकेट चाहत्यांना गेल्या आठवड्याभरात सलग दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे. विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावूक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
विराटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, मला कसोटी क्रिकेटमधील बॅगी ब्लू परिधान १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या फॉरमॅटने माझी कसोटी घेतली, घडवलं आणि असे धडे दिले जे इथून पुढील आयुष्यातही मला कामी येतील.
हेही वाचा : नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र; ना. चंद्रकांतदादा पाटील
त्याने पुढे म्हटले, पांढरे कापडे घालून खेळणं विशेष असतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. मी कृतज्ञतेच्या भावनेनं भरलेल्या हृदयानं या प्रवासातून बाहेर पडतोय. कसोटी क्रिकेटमधील माझा प्रवास, कायम हसत आणि अभिमानानं आठवत राहिल.
विराटच्या कसोटी कारकिर्दीचा आढावा
विराट कोहलीने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळले आणि ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या. यामध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारतासाठी सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक म्हणूनही नाव कमावले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाचाही समावेश आहे.