न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; श्रेयस अय्यरचे पुनरागमन

IND vs NZ | न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ नव्या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या या वनडे मालिकेने करणार असून ही मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने जाहीर केलेल्या या संघात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकणाऱ्या संघातील बहुतांश खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. कर्णधार म्हणून शुबमन गिल याचे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.
या मालिकेसाठी दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यर याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. जवळपास तीन महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याने पुन्हा सराव सुरू केला असून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत तो उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे, मात्र त्याचा सहभाग फिटनेस चाचणीवर अवलंबून असेल.
हेही वाचा : भाजपने गाफील ठेवले, आता त्यांना धडा शिकवणार; उदय सामंतांचा भाजपवर हल्लाबोल
भारतीय संघ (वनडे मालिका):
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.
न्यूझीलंडचा भारत दौरा २०२६ – वेळापत्रक
वनडे मालिका
- ११ जानेवारी – पहिला वनडे, वडोदरा (दु. १.३०)
- १४ जानेवारी – दुसरा वनडे, राजकोट (दु. १.३०)
- १८ जानेवारी – तिसरा वनडे, इंदूर (दु. १.३०)
टी-२० मालिका
- २१ जानेवारी – पहिला टी-२०, नागपूर (संध्या. ७)
- २३ जानेवारी – दुसरा टी-२०, रायपूर (संध्या. ७)
- २५ जानेवारी – तिसरा टी-२०, गुवाहाटी (संध्या. ७)
- २८ जानेवारी – चौथा टी-२०, विशाखापट्टणम (संध्या. ७)
- ३१ जानेवारी – पाचवा टी-२०, तिरुअनंतपुरम (संध्या. ७)




