राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ‘‘आरपीआय डेमोक्रॅटिक’’चा पाठिंबा
शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी भूमिकेचे केले स्वागत

व्यापक लोकशाही आघाडीची गरज म्हणून दिली साथ
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे लेखी निवेदन आरपीआय (डेमोक्रॅटिक) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद अशोक विधाटे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांना दिले.
शहरातील सामाजिक समता, संविधानिक मूल्ये, दलित, वंचित, ओबीसी, महिला व युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यापक लोकशाही आघाडीची आवश्यकता असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आरपीआय (डेमोक्रॅटिक) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात वैचारिक समन्वय असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही युती उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागयचं नसतं!

या पाठिंब्यामुळे महापालिका निवडणुकीत मतांचे विभाजन टळेल, लोकशाही मूल्ये अधिक बळकट होतील आणि शहराच्या विकासाला चालना मिळेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात जागावाटप, संयुक्त प्रचार व समन्वय समिती स्थापन करण्याबाबत चर्चा करण्याची तयारी आरपीआय (डेमोक्रॅटिक) ने दर्शवली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आरपीआय (डेमोक्रॅटिक) च्या या भूमिकेचे स्वागत करत ही आघाडी शहराच्या राजकारणात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आरपीआय (डेमोक्रॅटिक) चे उपाध्यक्ष सिद्धार्थ अशोक गायकवाड, युवक अध्यक्ष शंकर शिवाजी माने, ओबीसी सेल अध्यक्ष विजय महाजन, महिला आघाडी शहराध्यक्ष अश्विनी कदम व उपाध्यक्ष सारिका कापसे यांची उपस्थिती होती.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) ला दिलेला पाठिंबा हा सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्ये बळकट करणारा आहे. शहरातील दलित, वंचित, ओबीसी, महिला व युवकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा देण्यासाठी ही व्यापक लोकशाही आघाडी महत्त्वाची ठरेल. सर्व समविचारी शक्तींना सोबत घेऊन पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सकारात्मक व ठोस निर्णय घेऊ,”
— तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), पिंपरी-चिंचवड.




